धुळ्यात आलेल्या आमदारांच्या विधिमंडळ अंदाज समितीला 5 कोटी देण्याचा डाव!  रक्कम ठेवलेल्या खोली बाहेर माजी आमदार गोटेंनी मांडला ठिय्या !!

 

धुळे शहर

धुळे येथे आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीतील सदस्यांना देण्यासाठी गुलमोहर या शासकीय विश्रामगृहाच्या एका खोलीत पाच कोटी रुपये ठेवले आहेत असा आरोप करीत धुळ्याचे माजी आमदार तथा शिवसेना उभाठाचे नेते अनिल गोटे यांनी आज सायंकाळी त्यांनी या कुलूप बंद खोली बाहेर ठिय्या मांडला. यामुळे शासकीय यंत्रणे सोबतच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध शासकीय  विभागांचा कामांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र शासनाची अंदाज समित धुळ्यात दाखल झाली आहे. या समितीत विधिमंडळातील २९ आमदारांचा समावेश आहे. पैकी जवळपास ११ आमदार आज धुळ्यात दाखल झाले आहेत.

या समितीत सहभागी असलेल्या आमदारांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाच कोटी रुपये गोळा केले असून ते  विश्रामगृहाच्या १०२ क्रमांकाच्या खोलीत ठेवले आहेत असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने ही खोली आरक्षित करण्यात आली असल्याचेही गोटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. १५ मे पासून ही  खोली किशोर पाटील यांच्या नावाने आरक्षित करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.माजी आमदार अनिल गोटे यांनी संशयस्पद खोलीच्या बाहेर ठिय्या धरत खोलीला लावण्यात आलेले  कुलूप देखील खासगी व्यक्तीचे असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान, माजी आमदार अनिल गोटे यांच्या ठिय्या आंदोलनामुळे स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. गोटे यांच्या आरोपावर समितीत सहभागी आमदारांनी अजून तरी काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *