धुळे शहर
धुळे महापालिकेच्या वतीने पाईप लाईन टाकण्याचे निमित्त करुन चांगले रस्ते खोदून खराब केले जातात आणि पुन्हा पुन्हा पैशांची उधळपट्टी केली जाते, हा सर्व प्रकार वेळीच थांबवा. रस्ते तयार करण्यासाठी ‘नाशिक पॅटर्न’ राबवा असा सल्ला खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी महापालिका प्रशासनाला आज दिला.
मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या दालनात पावसाळ्याच्या अनुषंगाने खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीला कॉग्रेसचे नेते युवराज करनकाळ, इस्माईल पठाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रणजित भोसले, रमेश श्रीखंडे, पितांबर महाले, अतुल सोनवणे, उपायुक्त डॉ. शोभा बाविस्कर, नगरसचिव मनोज मोरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
महापालिका हद्दीत नव्याने १० गावांचा समावेश झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नियमित आणि कायमस्वरुपी पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी तापी पाणी पुरवठा योजनेची लाईन जीर्ण झाली असून नव्याने पाईपलाईन टाकण्याची गरज आहे. म्हणून केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाकडे २२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना ही या बैठकीत खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांनी दिल्या. तसेच नकाणे तलाव आणि डेडरगाव तलावाबाबत सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
शहरात लहान मोठे नाले असून त्यावर अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. पावसाळा सुरु होण्यापुर्वी ते काढून घेणे आवश्यक आहे. आवश्यक त्या ठिकाणी कॉंक्रेटीकरण करा. नागरिकांना सध्या वाढीव घरपट्टी येत असून त्याकडेही लक्ष देण्यात यावे अशी मागणी युवराज करनकाळ यांनी केल्यानंतर त्यावर लक्ष देण्याची सूचना खासदार शोभा बच्छाव यांनी केली.
रोज घंटागाडी येणे अपेक्षित आहे. किमान दोन ते तीन दिवसांनी घंटागाडी आली तरी चालेल. पण २० ते २२ दिवस होऊनही घंटागाडी येत नाही. विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. चालकांची मुजोरी वाढत असून दादागिरीची भाषा बोलली जाते. घंटागाडीच येत नसताना कोणत्या आधारावर महिन्याला ७० ते ८० लाखांची बिले कोणत्या आधारावर काढली जातात? असा सवाल रणजित भोसले यांनी उपस्थित केला. यावर तातडीने दखल घेवून कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.