महापालिका निवडणुकीसाठी भाजपत जोरदार इन्कमिंग..!

नरेंद्र अहिरेंच्या नेतृत्वात शिवसेना उबाठा, ओम शांती ग्रुपचे पदाधिकारी भाजपमध्ये

आमदार अनुप अग्रवाल, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी केले पक्षात स्वागत

 

धुळे शहर

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात तीन कोटींहून अधिक सक्रीय सदस्य आहेत, तर देशात सुमारे ११ कोटींहून अधिक सक्रीय सदस्य आहेत. यामुळे भाजप हा जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष ठरला आहे. अशा या सर्वांना सामावून घेणाऱ्या, सर्वसामान्यांच्या हितासाठी, देशाच्या अस्मितेसाठी, वंचितांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या या राजकीय पक्षात मी आमदार म्हणून आपणा सर्वांचे स्वागत करतो, असे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी आज येथे केले.

आमदार अनुप अग्रवाल यांच्या येथील मालेगाव रोडवरील जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी शिवसेनेच्या (ठाकरे गट) महाराष्ट्र वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष, महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य तथा शहरातील पारोळा रोड परिसरातील प्रभाग १० मधील ओम शांती सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र मोतीराम अहिरे, भाजपचे महेंद्र शेणगे यांच्या नेतृत्वात आज  शिवसेना व ओम शांती सोशल ग्रुपच्या पदाधिकारी व सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्यावेळी आमदार अग्रवाल बोलत होते.

भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर, ओमप्रकाश खंडेलवाल, माजी मंडळ अध्यक्ष बबनराव चौधरी, महेंद्र शेणगे, विनोद खेमनार, पवन जाजू आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नरेंद्र अहिरे यांच्यासह महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज खताळ, धुळे तालुका उपाध्यक्ष बळिराम पाटील, ओम शांती ग्रुपचे सचिव सोमनाथ चौधरी, मुकेश उपाध्याय, अशोक मराठे, सतीश अग्रवाल यांच्यासह ३० ते ३५ पदाधिकारी व सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

आमदार अग्रवाल यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करताना सांगितले, की केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारांच्या माध्यमातून तळागाळातील व विकासाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या सामाजिक घटकांच्या उत्थानासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. यात आमदार म्हणून माझा सुरवातीपासून समाजातील वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच विकासकामांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विविध सोयी-सुविधांची पूर्तता करण्यावर भर आहे. या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आपल्यासारखे सहकारी भाजपमध्ये दाखल होत आहेत. यातून आपणास पक्ष संघटन मजबूत करायचेच आहे. शिवाय यातून शहराला विकासाच्या वेगळ्या उंचीवर घेऊन जायचे आहे. त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.


जिल्हाध्यक्ष श्री. अंपळकर म्हणाले, की आपण आज भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासह आमच्यावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे. तुमच्या या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही. आमदार अग्रवाल यांच्या पुढाकाराने रावेर परिसरात सुरू होणाऱ्या एमआयडीसीमध्ये विविध उद्योगांमध्ये शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील युवक-युवतींच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्या परिसरात मूलभूत सोयी-सुविधांची पूर्तता करण्यावर आमचा भर राहील, अशी ग्वाहीही श्री. अंपळकर यांनी दिली.

क्रीडापटू जतीन वाडीलेचा सत्कार

यावेळी मोराणे (ता. धुळे) येथील श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी जतीन हरी वाडीले याचा विशेष गौरव करण्यात आला. जतीन याने या वर्षी दोंडाईचा येथे झालेल्या जिल्हास्तरीय फ्लोरबॉल स्पर्धेसह तमिळनाडूतील चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय फ्लोरबॉल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. यात महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले. त्यामुळे जतीनचा सुवर्णपदक देऊन गौरव झाला. तसेच गेल्या महिन्यात पुणे येथील राज्यस्तरीय  व  आग्रा येथील राष्ट्रीय लॅक्रोस या क्रीडा स्पर्धेतही महाराष्ट्र संघाचे जतीने प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेतही महाराष्ट्र संघाने रजतपदक पटकावले. तसेच नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेतही जतीनने ८१ टक्के गुण पटकावले. यानिमित्त आज आमदार अनुप अग्रवाल व गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते जतीनला पुष्पगुच्छ, शाल देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *