100 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील 17 तालुका कार्यालये नाशिक विभागात ठरली उत्कृष्ट कार्यालये
धुळे जिल्हा
राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यातील 17 तालुका कार्यालये नाशिक विभागात उत्कृष्ट कार्यालये ठरली आहेत. यात शिरपूर, धुळे व साक्री तालुक्यातील प्रत्येकी पाच कार्यालयांचा समावेश आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात
100 दिवस कृति आराखडा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व 358 तालुक्यांमधील 10,000 हून अधिक शासकीय कार्यालयांनी सहभागी होत कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा घडवून आणली. याचा महसुली विभागनिहाय उत्कृष्ट तालुका कार्यालयाचा
निकाल नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. यात नाशिक महसुल विभागात धुळे जिल्ह्यातील एकूण 17 उत्कृष्ट तालुका कार्यालयांची निवड झाली आहेत.
राज्य शासनामार्फत 100 दिवस कृति आराखड्यातंर्गत संकेतस्थळ (Website), सुकर जीवनमान (Ease of Living), स्वच्छता (Cleanliness) जनतेच्या तक्रारीचे निवारण (Grievance Redressal), कार्यालयीन सोयी व सुविधा (Amenities at Work Place), क्षेत्रीय कार्यालयांना भेटी (Field Visitis), ई-ऑफीस प्रणाली (E- Office), आर्थिक व औद्योगिक गुंतवणूकीस प्रोत्साहन (Investment Promotion), अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी आणि कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर (AI), नाविन्यपूर्ण उपक्रम (Innovative full-fledged activities) अशा 10 मुद्द्यांवर प्रत्येक कार्यालयाने कार्यवाही करावयाची होती. त्यानुसार
नाशिक विभागात धुळे जिल्ह्याने आपला ठसा उमटवत उल्लेखनीय प्रगती केली आहे. जिल्ह्यातील विविध तालुका कार्यालयांनी प्रशासनातील पारदर्शकता, नागरिकाभिमुख सेवा, डिजिटायझेशन, वेळेवर निर्णयप्रक्रिया आणि सेवा वितरणामध्ये लक्षणीय सुधारणा केल्या आहेत.
नाशिक विभागात धुळे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक, धुळे-2 आणि वन परिक्षेत्र अधिकारी, साक्री या दोन तालुका कार्यालयांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.
तर उपविभागीय अधिकारी, शिरपूर, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास, शिरपूर-1, बाल संरक्षण अधिकारी, शिरपुर-1, मुख्याधिकारी, नगर परिषद/ नगर पंचायत, शिरपूर, तालुका क्रीडा अधिकारी, साक्री, गट शिक्षण अधिकारी, धुळे या सहा कार्यालयांनी व्दितीय क्रमांक मिळविला आहे.
तसेच तहसिलदार, शिरपूर, उप अधिक्षक, भूमि अभिलेख, साक्री, गट विकास अधिकारी, शिंदखेडा, पोलिस निरीक्षक, पश्चिम देवपूर, धुळे, सहायक वन संरक्षक/उप विभागीय वन अधिकारी, धुळे, उप अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा), साक्री, सहायक पशुसंवर्धन आयुक्त, तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय, शिंदखेडा, उप विभागीय जलसंधारण अधिकारी, धुळे, सहायक निबंधक (सहकारी संस्था) साक्री या नऊ कार्यालयांनी तृतीय क्रमांक मिळविला आहेत.
धुळे जिल्ह्यात शंभर दिवस कृति आराखड्याची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
जिल्ह्यातील निवड झालेल्या सर्व कार्यालय प्रमुखांचे, संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अभिनंदन केले. तसेच राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे शासकीय कार्यालयातील कामकाजाची कार्यक्षमता वाढून सामान्य नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.
00000