धुळे पोलिसांनी जिल्ह्याभर राबवले नाकाबंदीसह कोंबींग ऑपरेशन
एलसीबी पथकाने सुरत बायपासवर स्पिरीट वाहणारा ट्रक पकडला
धुळे जिल्हा
आगामी सण-उत्सवाच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीत रात्री पोलिस दलातर्फे नाकाबंदी करीत कोबींग ऑपरेशन राबवण्यात आले. या कोंबींग ऑपरेशनच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे शहरात सुरत बायपास रोडवर बनावट दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे स्पिरीट रसायन वाहतुक करणारे वाहन पकडले. यावेळी लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रात्री करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना प्राप्त गोपनिय माहितीचे आधारे पथकाने धुळे शहर पोलीस ठाणेचे हद्दीतील सुरत बायपास रोडवरील हिरे मेडीकल समोरील उड्डाण पुलाजवळील रोडवर मालट्रक क्र. एमएच १८/ पीजी २९९९ याची तपासणी केली असता, त्यात २०० लिटर क्षमतेचे ०५ रिकामे ड्रम आणि १० ड्रम मध्ये मानवी आरोग्यास अपायकारक व नशाकारक होईल अशी बनावट दारु तयार करण्यासाठीचे स्पिरीट मिळुन आले आहे. या कारवाईत एकुण ३ लाख रुपये किं.चे २०० लिटर क्षमतेचे एकुण १० प्लॅस्टिक ड्रम मधील स्पिरीट हस्तगत करुन चालक सुरेंद्र पंडीत मराठे, वय-४२ वर्ष, रा.वॉर्ड नं.२, नवीन बस स्थानक, सेंधवा जि. बडवाणी याच्या विरुध्द धुळे शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली.
तसेच या नाकाबंदी दरम्यान जिल्ह्याभरात एकुण १३ आरोपीविरुध्द गावठी हातभट्टी दारुची अवैध वाहतुक आणि विक्री करतांना पकडण्यात आले. तसेच वाहतुक शाखेरे मोटर व्हेईकल कायद्यान्वये एकुण ९६ गुन्हे दाखल करुन ४७ हजार ७०० रुपयांचा दंड वसुल केला.
नाकाबंदी व कोंबींग ऑपरेशन प्रभावी होण्याचे दृष्टीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व शाखा अधिकारी यांना सुचना देवून पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी देखरेख करुन नाकाबंदी पॉईंट येथे भेट दिली. नाकाबंदी व कोंबींग ऑपरेशन दरम्यान अवैध हातभट्टी ठिकाणांवर कारवाई, अभिलेखावरील सराईत गुन्हेगार व हिस्ट्रिशिटर यांना चेक केले, हद्दीतील हॉटेल, लॉजेस, धाबे व गुन्हेगारी वस्त्या व पान टपरी यांची तपासणी केली. दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी केली, मोटार व्हेईकल कायद्यान्वये केसेस करुन दंड वसुल करण्यात आला, सोडा विक्री गाडींवर दारु पितांना मिळुन आलेल्यांवर तसेच कॅफे, टपर्या, खाण्याची ठिकाणे व विविध ठिकाणी बसलेल्या टोळया यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.
“यापुढे देखील अशाचप्रकारे वेळोवेळी नाकाबंदी, कोंबींग व ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात येवून गुंडगिरी करणारे आणि टवाळखोर व असामाजिक घटकांवर प्रभावी कायदेशिर कारवाया करण्यात येईल”.
– श्रीकांत धिवरे, पोलिस अधिक्षक, धुळे