मारहाणीचा बदला घेत जिवे मारले ; तिघे जणांना अटक
धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यातील थाळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरपुर-गरताड रस्त्यावर ५ मे २०२५ रोजी अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळला होता. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत अज्ञात लोकांनी मारहाण करुन रुमालाने त्याचा गळा आवळून खून केल्याचे निदर्शनास आले. या खूनाचा शोध लावून तिघा संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. उमेश ऊर्फ राहुल कंदारसिंह चौहाण, रा. उपला ता. राजपुर जि.बडवाणी ह.मु. मधुकर चित्र मंदीर जवळ, नरडाणा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव-गाव आहे. मारेकर्यांपैकी अल्पवयीन युवकासह दोघांना मयत राहुलने मारहाण केली होती, त्याचा बदला घेण्यासाठी कट रचून त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले.
या प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. मृतदेह मिळाल्यापासुन या गुन्ह्याबाबत कोणतीही उपयुक्त माहिती मिळत नव्हती तथापी ९ मे रोजी तपास अधिकारी सहय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी मृताच्या अंगावरील जप्त कपड्यांची तपासणी केली असता शर्टच्या खिश्याला एक चुरघळलेल्या कागदाची तुकडे झालेली चिड्डी निघाली.या चिट्ठीवर असलेल्या मोबाईल क्रमांकातील शेवटचे दोन अंक जुळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले अखेर शेवटचा अंक ५६ असल्याची खात्री झाली आणि या मोबाईल क्रमांकाची तांत्रिक तपासणी झाली.
या क्रमांकाचा मोबाईल संजय कनोज ह.मु. ब्राम्हणे (ता. शिंदखेडा) हा वापरत असल्याचे उघड झाले.परंतु त्यांच्याकडे तपास केल्यावर हा मोबाईल त्याचा पुतण्या दयाराम कनोज याचे सोबत असल्याचे कळाले.तो झरीमाता ता.नेवाली जि. बडवाणी (म.प्र.) येथे गेल्याचे समजल्यावर थाळनेर पोलीस आणि गुन्हे शाखेतील सहकारी असे पथक मध्य प्रदेश मध्ये पोहोचले. तेथील दोघांना मृताचे फोटो दाखविले असता त्यांनी मृत व्यक्ती हा त्यांचा पाहुणा उमेश ऊर्फ राहुल कंदारसिंह चौहाण, रा. उपला ता. राजपुर जि.बडवाणी ह.मु. मधुकर चित्र मंदीर जवळ, नरडाणा हा असल्याची माहिती त्यांनी पोलीसांना दिली. यानंतर पोलिसांनी १२ मे २०२५ रोजी नरडाणा गावातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहुन आकाश कैलास पावरा हा मृत उमेश चौहाण याच्या सोबत असल्याचे दिसले.निमझरी रोड (ता.शिरपुर) येथुन त्यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता साथीदार दिलीप पावरा, घनदास ऊर्फ गुड्ड पावरा व लहान भाऊ विधीसंघर्षीत बालक यांनी एकत्र येऊन उमेश ऊर्फ राहुल यास जिवे ठार मारल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलीप पावरा व विधीसंघर्षित बालक यांना नरडाणा येथून तर घनदास पावरा यास भुरापाणी ता. नेवाली जि. बडवाणी (म.प्र.) येथुन ताब्यात घेण्यात आले. उमेश ऊर्फ राहुल चौहाण याने विधीसंघर्षीत बालकास शेतात मजुर पाठविण्याच्या कारणावरुन मारहाण केली होती व घनदास ऊर्फ गुड्डु जाधव यास जुने भांडणाचे कारणावरुन १ महिन्यापूर्वी नरडाणा येथील घरात घुसुन मारहाण केली होती, या घटनाचा बदला म्हणुन घनदास ऊर्फ गुड्डु प्रेमसिंग जाधव (पावरा,वय ३६ वर्षे) दिलीप कैलास (पावरा,वय २१ वर्षे), आकाश कैलास (पावरा, वय १९ वर्षे) व विधीसंघर्षीत बालक (वय १७ वर्षे) सर्व रा.नरडाणा (ता.शिंदखेडा) यांनी ४ मे २०२५ रोजी रात्री नरडाणा येथे कट कारस्थान रचून गरताड रोड वरील हॉटेल सनी गार्डनचे पुढे रोड लगत उखा बंडू ठाकरे यांचे शेतात त्यास नेवून मारहाण करण्यात आली. अखेर त्याचा रुमालाने गळा आवळून जिवे ठार मारण्यात आले आणि शेतात फेकुन मारेकर्यांनी पळ काढला. याप्रकरणी पोलीसांनी संशयितांना नरडाणा व मध्य प्रदेश येथुन ताब्यात घेण्यात आले असुन विधीसंघर्षीत बालक यांचे वयाची तपासणी करुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.