मुंबई
र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे मान्सून पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या वर्षी १९ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती. त्यानंतर नियोजित वेळेच्या आधीच म्हणजेच ३० मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता.
यंदाही तशीच स्थिती असण्याची शक्यता आहे. दरम्यान, केरळमध्ये र्नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यत: १ जूनच्या आसपास दाखल होतो. मात्र, मागील ५ वर्षांमध्ये मोसमी पाऊस ३ वर्षे ठरावीक वेळेच्या नंतर म्हणजेच उशिरा दाखल झाला. तर २ वर्षे मोसमी पाऊस वेळेच्या आधी दाखल झाला. केरळमध्ये भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत तारखेनुसार म्हणजेच १ जूनपूर्वी पाच दिवस आधी किंवा नंतर पावसाचे आगमन होऊ शकते. (म्हणजे २७ मे ते ५ जूनदरम्यान) यानंतर पाऊस हळूहळू देशभर पसरतो.
यंदा देशात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत १०५ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच राज्यातही सर्वदूर चांगला पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.