आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी संवेदनशील राहून काम करावे दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : जिल्हाधिकारी
धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठक संपन्न
धुळे जिल्हा
आपत्तीच्या काळात प्रत्येक विभागाने आपआपल्या जबाबदाऱ्याची जाणीव ठेवावी. आपसात समन्वय राखून, संवेदनशील राहून प्रभावी पद्धतीने कामकाज करावे. जे अधिकारी आपत्ती काळात वेळेत प्रतिसाद देणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेद्र पापळकर यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज मान्सुनपूर्व कालावधीत करावयाच्या तयारीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी श्री. पापळकर बोलत होते. अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव, महापालिका उपायुक्त हेमंत निकम, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, शरद मंडलिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले की, मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागाने सज्ज रहावे, ज्या विभागांनी अद्याप आपत्ती व्यवस्थापन आराखडा सादर केला नाही अशा विभागांनी त्वरीत आराखडा तयार करावा. आपत्ती व्यवस्थापन काळात सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. आपापल्या विभागावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. नैसर्गिक आपत्तीबाबत मागविलेली माहिती सर्व विभागांनी वेळेत सादर करावी. शोध व बचाव साहित्याची तपासणी करून घ्यावी, पूररेषेची पाहणी करावी. नदीकाठावरील गावात आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करावी. महानगरपालिका, नगरपालिकेने धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घ्यावे. कृषी विभागाने हवामान खात्याकडून येणारा इशारा तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. जिल्ह्यातील सर्व तलाव, पाझर तलाव, लघु व मध्यम प्रकल्प ज्या विभागाच्या अधिपत्याखाली आहे त्याठिकाणी धरणनिहाय समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात यावे. कोणतीही दुर्घटना घडल्यास सर्व संबंधित विभागांनी त्वरीत मदत करावी. जिल्ह्यात झालेल्या आपत्तीची माहिती वरिष्ठांकडे तातडीने देण्यात यावी. नदी, नाल्याच्या कठडे, पुलावरुन पाणी जात असतांना अपघात होवू नये यासाठी याठिकाणी स्वयंसेवक, पोलीस बंदोबस्त ठेवावा, नागरिकांना पुलावरुन जाण्यासाठी परावृत्त करावे. जेसीबी व डंपर चालकांची माहिती संकलीत करुन ठेवावी. तसेच आपत्तीच्या काळात प्रत्येक विभाग व यंत्रणेने संवेदनशील रहावे. आपत्तीकाळात जबाबदार अधिकारी यांनी वेळेत प्रतिसाद देण्याच्या सूचना श्री. पापळकर यांनी दिल्यात.
अपर जिल्हाधिकारी श्री. बोरकर म्हणाले की, मान्सुन काळात वादळी वाऱ्याने होर्डिग पडण्याची शक्यता असल्याने महापालिका, नगरपालिकने अनाधिकृत होर्डिग्ज काढून टाकावीत. वैध होर्डिग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्यात.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री.शेलार म्हणाले की, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीने मान्सूनपुर्व रस्ता दुरुस्ती, गटार व नालेसफाई, विद्युत दुरुस्तीची कामे वेळेत करावी. कार्यालयप्रमुखांनी पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. संबंधित विभागांनी नियंत्रण कक्ष स्थापन करावे आणि त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. पूरग्रस्त व दरडग्रस्त गावांसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. धरणनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात यावे. आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांबाबत पुरेसा औषधसाठा करून ठेवावा. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंश प्रतिबंधक लशीसह औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. कार्यकारी अभियंता आणि तहसिलदार यांनी संयुक्तपणे लघु व मध्यम प्रकल्पाची पाहणी करून आवश्यकता असल्यास कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ दुरूस्ती करून घ्यावी. तसेच बंधाऱ्याचे दरवाजे, गेट कार्यान्वित होतात किंवा नाही याची तपासणी करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने भूस्खलनाचे ठिकाणांची निश्चिती करून आवश्यक उपायययोजना कराव्यात. रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडे व झाडाच्या फांद्यांबाबत आवश्यक कार्यवाही करावी. महावितरणने विद्युत तारांची आवश्यक कामे पूर्ण करुन पाणीपुरवठा योजना, नगरपालिकेच्या क्षेत्रातील वीज पूरवठा मान्सून काळात खंडीत होणार नाही यांची दक्षता घेण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्यात.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. सोनवणे यांनी मागील काळात आलेल्या आपत्तीच्या घटनांची माहिती दिली. मान्सूनपूर्व कालावधीत सर्व संबंधित यंत्रणांनी केलेल्या तयारीची माहिती बैठकीत दिली.