धुळ्यात श्रीराम सृष्टी ‘ थीम पार्क’ उभारण्यात येणार
आमदार अनुप अग्रवाल यांनी केली जागेची पाहणी धुळे शहर
धुळे शहरातील सुरत बायपास रोड लगतच्या सर्व्हे नं. ५१० मध्ये सरकारी जमिनीवर सुमारे ५० एकर जागेत २०० कोटीतून भव्य श्रीराम सृष्टी ‘ थीम पार्क’ उभारण्यात येणार असल्याचे धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले.
या जागेची पहाणी आज आमदार अनुप अग्रवाल यांनी केली. आ. अग्रवाल यांनी भव्य श्रीराम सृष्टी उभारण्याचे वचन धुळेकरांना निवडणूक प्रचारात दिले होते. त्यानुसार आ. अग्रवाल यांनी या कामाला गती दिली आहे.
श्रीरामसृष्टी ‘ थीम पार्क’ उभारण्यासाठी आज प्रत्यक्ष जागेचे मोजमाप करण्यासही सुरवात करण्यात आली. शासनाकडून टप्प्या-टप्प्याने निधी आणून सदर प्रोजेक्टचे काम मार्गी लावले जाईल. श्रीराम सृष्टीमुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार असून यातून शेकडो जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती आ.अनुप अग्रवाल यांनी सदर जागेच्या पहाणीप्रसंगी दिली.
आमदार अनुप अग्रवाल यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात भव्य श्रीराम सृष्टी उभारण्याचे आश्वासन धुळेकर जनतेला दिले होते. त्यानुसार त्यांनी श्रीराम सृष्टी उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. सुरत बायपास महामार्गावर एमआयडीसीच्या बाजुला असलेल्या जागेवर श्रीराम सृष्टी अर्थात थीम पार्क उभारण्यात येणार आहे. त्यानुसार आज आ. अग्रवाल यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसमवेत सदर जागेची प्रत्यक्ष पहाणी केली.
यावेळी आ. अग्रवाल यांच्यासमवेत ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, चंद्रकांत सोनार, डॉ. सुशिल महाजन, यशवंत येवलेकर, जीवनआबा शेंडगे, नागसेन बोरसे, विकी परदेशी, प्रवीण अग्रवाल, सुहास अंपळकर, किरण चौधरी, योगेश थोरात, राकेश कुलेवार, छोटू थोरात, पंकज धात्रक, कल्याणी अंपळकर, जयश्री अहिरराव, किरण कुलेवार, वैभवी दुसाणे, महेंद्र परदेशी, मनपाचे अभियंता चंद्रकांत उगले, सहायक संचालक प्रकाश सोनवणे, कमलेश सोनवणे, सहायक अभियंता मनिष पाटील, आरेखक मयूर भट, कनिष्ठ अभियंता सागर कोळी, शशी मराठे आदी उपस्थित होते.
या पहाणीप्रसंगी आ. अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, या जागेत भव्य थीम पार्क साकारले जाणार आहे. सदर जागेचा सव्र्व्हे नं. ५१० ड असून यातील सुमारे ५० एकर सरकारी पडीक जमीन आहे. काहीजण या जागेवर दावा सांगत आहेत. सदर वाद सनदशीर मार्गाने मिटविण्यात येतील. या जागेची परिस्थिती पहाता असे दिसते की या जागेतील माती, मुरुम, खडी काढून नेण्यात आली आहे. ही जागा संबंधितांची असेल तर त्यांनी दगड, मुरुम चोरीचा प्रकार केला आहे का, हेही बघावे लागेल.
सदर जागेचे सर्व उतारे तपासले आहेत. सर्च रिपोर्टही काढला आहे. त्यानंतरच महापालिकेला जागेची मोजणीसाठी पैसे भरायला लावले. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून जागेची मोजणी सुरु केली आहे. हा गट सुमारे ४०० ते ५०० एकरचा असून त्यापैकी २५ ते ५० एकर जागा आपल्याला श्रीराम सृष्टीसाठी लागणार आहे. या जागेत सुमारे २०० कोटी खर्चातून सुंदर थीम पार्क उभारले जाईल, अशी माहितीही आ. अग्रवाल यांनी यावेळी दिली.
डॅमध्ये बोटींग सुरु केली जाईल. तसेच देखावा, मंदिर, गार्डन, लहानशे झू देखील केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून तेथे नाममत्र तिकीट दर ठेवण्यात येईल. त्या पैशातूनच तेथील मेटेनंन्स ठेवण्यात येईल. भविष्यात जवळच एमआयडीसी येत आहे, लिंक रोडचे काम सुरु आहे, रेल्वेचेही काम सुरु आहे. धुळ्याला भरपूर स्कोप आहे. त्यानुसार थीम पार्क हे शहरविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असून यातून सुमारे ५०० ते ८०० लोकांना रोजगार मिळणार असल्याचेही आ. अग्रवाल म्हणाले. तसेच एमआयडीसी व रिव्हर फ्रंटचे धुळेकरांना दिलेले आश्वासन पुर्ण करण्यासाठी देखील पाठपुरावा सुरु असल्याचे आ. अग्रवाल यांनी सांगितले.