भाऊसाहेब हिरे मेडिकल मध्ये एचआयव्ही बाधित २० रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया

श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामगिरीवर जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले कौतुक

धुळे जिल्हा

धुळे शहरातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात मोतिबिंदू जनजागृती, उपचार अभियान नुकतेच संपन्न झाले. या अभियानांतर्गत एचआयव्ही बाधित २० रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली यशस्वीपणे करण्यात आली. राज्यात अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया धुळ्यात झाली आहे. याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रुग्णालयात जावून नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. मुकर्रम खान, डॉ. मुकेश सैनी यांच्यासह रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

राज्य शासनातर्फे १०० दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत आहे. या अंतर्गत धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. या रुग्णांपैकी एक रुग्ण क्षयबाधित होता, तर ११ वर्षीय बालिकेवरही शस्त्रक्रिया करण्यात आली. एका महिला रुग्णाचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला होता, दुसर्‍या डोळ्यास मोतिबिंदू झाला होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, असे डॉ. खान यांनी सांगितले.

या रुग्णांवर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे, डॉ. माया वसईकर, डॉ. अमिता रानडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. खान, डॉ. सैनी यांच्यासह डॉ. आस्मा फरहीन, डॉ. जिवांक्षा पोवार, डॉ. निकिता वसावे, डॉ. अंकिता पटेल, डॉ. विनोद धूत, डॉ. अमोल घुले, डॉ. निकिता इंगोले, डॉ. आदिती कासट, डॉ. अनंत मांडवे, डॉ. आयशा शेख यांनी औषधोपचार केले. त्यांना अधिसेविका अरुणा भराडे, साधना पाडवी, प्रवीण माळी, अतुल आगमकर, नीलेश वाडेकर, पुष्पा कुवर, नीलम धूम, विलास गावित, नम्रता वळवी, अक्षय माळी, रुकसाना शेख यांनी सहकार्य केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी पापळकर यांनी समाधान व्यक्त करून कोणताही रुग्ण औषधोपचाराविना राहू नये, सर्वसामान्यांचे जीवनमान अधिक सुकर होण्यासाठी नियोजन रुग्णालयाने करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *