धुळयाची आंतरराष्ट्रीय दिव्यांग ज्युडोपटू कु. वैष्णवी बाला मोरे हिस शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार !
धुळयात क्रीडा क्षेत्रात आनंद !!
धुळे जिल्हा
धुळयाच्या देवपुरातील एकविरा देवी मंदीर परिसरात रहाणारी कुस्तीगीर व आंतरराष्ट्रीय ज्यूडोपटू दिव्यांग असणारी कु. वैष्णवी बाला मोरे हीस सन 2023-24 चा शिवछत्रपती राज्य पुरस्कार थेट जाहीर झाला आहे. गेल्या 6 वर्षा पासून वैष्णवीने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांग खेळाडू गटातून मिळवलेल्या विविध पदाकांच्या आधारे तिला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
वैष्णवी बाला मोरे ही जन्मताच मुक व बधीर असून तिला बालवया पासूनकुस्ती व विविध खेळांची आवड होती. धुळयाच्या प्रा. रघुनाथ केले वाक्-श्रवण विकास विद्यालय येथे शिकत असतांना तिच्या शिक्षीकांच्या नजरेत तिचे क्रीडागुण लक्षात आले आणि तिला विविध क्रीडा क्षेत्रात खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिच्या घरा शेजारी असणार्या जवाहर स्टेडीयम मुळे तिला कुस्ती पहाण्याची व खेळण्याची आवड निर्माण झाली. त्यानुसार तिने कुस्ती व ज्युडो मध्ये विशेष प्रावीण्य मिळविले. भारतातर्फे तिने ब्राझील, तुकीस्तान, कझेगीस्तान, मलेशिया, या सह 7 देशांमध्ये स्पर्धेत सहभागी होवून ज्यूडी चॅम्पीयनशिप मध्ये सुवर्ण पदक मिळविले. या शिवाय देश पातळीवरील दिल्ली, कानपूर, इंदोर, बेंगलोर आदी ठिकाणी वैष्णवीने महाराष्ट्रासकट भारताचे प्रतिनिधीत्व करून पदके मिळविली आहेत. ती सध्या धुळयाच्या एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयात एफ.वाय.बी.ए. च्या वर्गात शिकत असून येणार्या काळात भारतातर्फे दिव्यांगांसाठी टोकियो येथे होणार्या ऑलींम्पीक 2025 मध्ये 75 किलो वजनी गटात ज्युडो मध्ये सुवर्ण पदक मिळविण्याचा तिचा मानस आहे.
कु. वैष्णवी बाला मोरे हीस पुणे येथील सहयांद्री संकुल, वारजे येथे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या तज्ञ कोच श्रीमती. रचना धोपेश्वर व विजय बराटे यांनी मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले. या पुर्वी देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते तिचा दिल्ली येथे सत्कार करण्यात आला. तसेच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे, तत्कालीन क्रीडामंत्री उदय सामंत, आयपीएस विश्वास नागरेपाटील यांच्या हस्ते तिला महाराष्ट्र आयकॉन पुरस्कारही देण्यात आला आहे. कु. वैष्णवी मोरे हीस पुरस्कार प्राप्त होण्यासाठी धुळयाचे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र पापळकर, क्रीडा सहसंचालक श्री. संजय सबनिस, छत्रपती पुरस्कार विजेते व माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी श्री. अविनाश टिळे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तिच्या यशासाठी वडील बाला मोरे, मातोश्री चंदनबाई मोरे, काका सुदाम मोरे, बन्सी मोरे, चंदू मोरे, प्रभू मोरे व बंधू गौरव मोरे यांची प्रेरणा लाभली.
कु. वैष्णवी मोरे हिचे धुळयाच्या खासदार डॉ. सौ. शोभाताई बच्छाव,धुळयाचे आमदार अनुपभैय्या अग्रवाल, प्रथम महापौर भगवानबापूजी करनकाळ, कानुश्री संस्थेचे सुनिलतात्या नेरकर व मोरे परिवारावर प्रेम करणार्या अनेकांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले आहे. कु. वैष्णवी मोरे हिच्या प्रशिक्षक श्रीमती रचना धोपेश्वर यांना देखील क्रीडा प्रशिक्षकासाठी असणारा जिजामाता पुरस्कार मिळाला आहे.
दि. 18 एप्रिल 2025 रोजी पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात भव्य दिमाखदार कार्यक्रमात राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उप मुख्यमंत्री, क्रीडा मंत्री व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11.00 वा. पुरस्कार वितरण होणार आहे. तिला रू. 3 लाख व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.