धुळे जिल्हा
धुळे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त आज राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील प्रावीण्य प्राप्त आणि सहभागी झालेल्या ४७ खेळांडूचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, धनादेश पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात हा कार्यक्रम झाला.
प्रारंभी, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिप प्रज्वलन करुन राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व खेळाडूंनी शपथ घेतली. तसेच स्व.खाशाबा जाधव यांच्या जीवन चरित्र्यावर आधारित निबंध स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना त्याचप्रमाणे १७ खेळाडूंना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येवून सत्कार करण्यात आला.
आमदार राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, क्रीडा अधिकारी रेखा पाटील, धुळे क्रीडा महासंघाचे सचिव पंढरीनाथ बडगुजर, धुळे जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे सचिव आनंद पवार, धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव सुनील चौधरी, महाराष्ट्र नेटबॉल संघटनेचे योगेश वाघ यांच्यासह आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले आणि प्राविण्य प्राप्त खेळाडू उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील यांनी केले. सूत्रसंचलन योगेश्वरी मिस्तरी यांनी, तर श्रीधर कोठावदे यांनी आभार मानले.