धुळे जिल्ह्यात कर्करोग तपासणी मोहिमेत 3 लाख 61 लाख नागरिकांची तपासणी ; उच्च रक्तदाब, मधुमेहाचीही तपासणी

उच्च रक्तदाबासाठी 4 लाख 85 हजार 244 नागरिकांची तपासणी

मधुमेहासाठी 4 लाख 74 हजार 832 नागरिकांची तपासणी

धुळे जिल्हा

जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार जनतेमध्ये कर्करोगाबाबत जागृती निर्माण करुन वेळीच निदान व उपचार करण्यासाठी 4 फेब्रुवारी ते 31 जुलै, 2025 या सहा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात कर्करोग जनजागृती व तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत 3 लाख 61 हजार 557 नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीचा पुढील अंतिम टप्पा 1 ते 31 ऑगस्ट, 2025 दरम्यान होणार असल्याने नागरिकांनी मोफत तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात ही तपासणी घेण्यात आली. यात मुख, गर्भाशय ग्रीवा व स्तन कर्करोगासह एनसीडी आजारांची प्राथमिक व सखोल तपासणी केली. या तपासणीतून 107 नागरिकांची बायोप्सी करण्यात आले व 12 रुग्णाचे निदान झाले आहे. तसेच उच्च रक्तदाबासाठी 4 लाख 85 हजार 244 नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून 48 हजार 459 रुग्णाचे निदान झाले. तर मधुमेहासाठी 4 लाख 74 हजार 832 नागरिकांची तपासणी करुन 15 हजार 122 रुग्णांचे निदान झाले आहे. या मोहिमेत अनेक नागरिकांनी सहभाग घेतला असून संशयित रुग्णांची यादी तयार करुन पुढील तपासणीसाठी व उपचारासाठी त्यांना संदर्भित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागात राज्यस्तरावरुन पाठविण्यात आलेल्या कॅन्सर व्हॅनद्वारे 5 हजार 895 नागरिकांची कर्करोग तपासणी केली आहे. या तपासणीचा पुढील अंतिम टप्पा 1 ते 31 ऑगस्ट, 2025 दरम्यान होणार आहे. या टप्यात आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व नागरिक, विशेषत: 30 वर्षावरील पुरुष व महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी गावपातळीवर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लवकर निदान व त्वरित उचार हाच कर्करोगावर मात करण्याचा प्रभावी मार्ग असल्याने नागरिकांनी तपासणी मोहिमेत मोठया संख्यने सहभागी होऊन मोफत कर्करोग तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *