धुळे जिल्ह्यात 3 धरणे भरली ; पांझरेत पाणी सोडले, फारशी पूल बंद

 

धुळे जिल्हा

जिल्ह्याच्या माळमाथ्यावर पावसाचे प्रमाण वाढल्याने पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. एकट्या पांझरा (अक्कलपाडा) मध्यम प्रकल्पातून पाच हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले,यामुळे पांझरा नदीतील पाण्याची पातळी वाढली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

शहरातील देवपूर भागास जोडणार्‍या कालिका देवी मंदिर मंदिराजवळील पाईप मोरी (पूल) वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. यामुळे त्या-त्या भागातील लहान मोठे तलाव,प्रकल्पामधील पाण्याची पातळी वाढली आहे.शासनाच्या मध्यम प्रकल्प विभाग आणि अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग यांच्यातर्फे जिल्ह्यातील प्रकल्पात वाढणारा पाणी साठा आणि साठवण क्षमतेच्या अनुषंगाने आवश्यकती खबरदारी घेण्यात येते आहे.याचाच एक भाग म्हणून मध्यम प्रकल्प विभाग आणि अक्कलपाडा प्रकल्प उपविभागाच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या वाढत्या पावसाचा विचार करून अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असलेल्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे पुढे अक्कलपाडा धरणात पाण्याचा येवा वाढत आहे. यामुळे निम्न पांझरा (अक्कलपाडा ) मध्यम प्रकल्पातून तीन हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे.काही वेळात हा विसर्ग पुन्हा वाढविण्यात येणार असून पावणे बारा वाजेनंतर पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पांझरा नदीच्या दोन्ही काठावरील नागरिकांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे.

महापालिकेचे अग्निशमन दल व आपत्कालीन सेवा विभाग मार्फत पांझरा नदी किनार्‍या लगत रहिवासास असलेल्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,कालिका माता मंदिर जवळील रहदारी पूल बंद करण्यात आला आहे असे कळविण्यात आले आहे.

प्रकल्पातील जलसाठा असा:-कंसात गेल्यावर्षाचा जलसाठा

-पांझरा सद्यस्थिती-१००टक्के (२५),मालनगाव-१०० (५८),जामखेडी-१०० (३४), कनोली-१४(३०),बुराई-३५(२०),करवंद-३५(२०), अनेर-२९(३४),सोनवद-०९ (०९),अक्कलपाडा-८२ (०७), वाडीशेवाडी-४४ (१३),अमरावती-५५ (०), सुलवाडे-३० (२२).

शिंदखेडा व धुळे तालुक्यात जुलैअखेर दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर कनोली, बुराई, करवद, सोनवद, अमरावती, सुलवाई या प्रकल्पामध्ये अद्याप पुरेसा साठा झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *