धुळे जिल्ह्यात वाढलेल्या चोरी, घरफोडीच्या नियंत्रणासाठी पोलीस अधीक्षकांनी दिले ‘हे’ विशेष निर्देश

धुळे जिल्ह्यात वाढलेल्या चोरी, घरफोडीच्या

नियंत्रणासाठी पोलीसांकडून विशेष मोहिम

धुळे शहर

धुळे शहर आणि जिल्ह्यात वाढलेल्या चोरी, घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धुळे जिल्ह्यात व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. नियमित कोठडी तपासणीबरोबरच आता विशेष लक्ष घरफोडी प्रतिबंधावर केंद्रित करण्यात येणार असून रात्रीची गस्त, नाकाबंदी, चित्रिकरण यंत्रणांची पडताळणी आणि संवेदनशील भागांची नव्याने मांडणी अशा विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार सर्व अधिकारी पोलीस ठाण्यांना भेट देऊन कोठडीची तपासणी करतात; मात्र यापुढे प्रत्येक भेटीत घरफोडी प्रतिबंधात्मक उपायांचा स्वतंत्र आढावा घेण्याचे निर्देश पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. अलीकडील घरफोडीच्या गुन्ह्यांचा आणि अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍यांच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करून त्यानुसार गस्तीची आखणी बदलण्यात येणार आहे.

रात्रगस्तीवरील सर्व पोलीस कर्मचार्‍यांना एका संवेदनशील ठिकाणी एकत्र बोलावून विशेष सूचना दिल्या जाणार आहेत. घरफोडीप्रवण भागात गस्त क्षेत्र स्पष्टपणे वाटप करून जबाबदारी निश्चित केली जाईल. गस्तीची वेळ आणि ठिकाण परिणामकारकतेसाठी अनियमित ठेवण्यात येईल, जेणेकरून ठराविक पद्धत टाळता येईल. गाव तसेच मोहल्ला संरक्षण पथकांची तपासणी करून त्यांना प्रोत्साहन आणि आवश्यक मार्गदर्शन दिले जाईल. स्थानिक पातळीवरील सतर्कता वाढवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवण्यात येईल अशी माहिती पोलीस अधिकक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *