लग्नात विघ्न.. पिंपळनेर येथे लग्न कार्यात
दोन गटातील वादात तिघांचा खून
धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लग्नकार्यादरम्यान दोन गटात झालेल्या वादातून धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास घडली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात एक लग्न कार्य होते. येथे साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये लग्न पत्रिकेत नाव टाकण्यावरून वाद झाला. याच वादातून लग्नस्थळी दोन्ही गटात जोरदार हाणामारी सुरू होऊन त्यात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे.
या हल्ल्यात देवेंद्र पवार (वय ३६), सुरेश गोसावी (वय ५५) आणि साहील गोसावी (वय २२) अशी मृत्यू झालेल्याची नावे आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींपैकी एकास पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

लग्नसोहळ्यातील या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत मोठा बंदोबस्त तैनात केला तसेच तपास सुरू केला. तसेच सोनगड गुजरात येथे पळून जाणाऱ्या तिघा संशयीतांना गुजरात सीमेवर पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.