धुळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांतुन शिवरायांना मानवंदना

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची तलवारबाजी, समूह नृत्य, हिरकणी नाट्य, पोवाडे 

धुळे जिल्हा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्याजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचे धुळ्यात बुधवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा घोष केला.

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन राजर्षी शाहू महाराज नाट्यगृह, धुळे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) संदीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) अजय फडोळ, जिल्हा नियेाजन अधिकारी सुनील सोनार, जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संतोष वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेख म्हणाले की, राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राज्य महोत्सवातंर्गत आपल्या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांस मोठया संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, समूह नृत्य, हिरकणी नाट्य, पोवाडे, शिवकालीन शस्त्रप्रात्यक्षिक, तलवारबाजीचे प्रात्यक्षिक आदी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.

कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या घोषणांनी वातावरण भारावून टाकत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, तसेच मंडळ अधिकारी अर्चना पौळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *