अखेर ठरले! मुंबई च्या महापौर पदासाठी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौर पदासाठी सेनेचे संजय घाडी यांचे अर्ज दाखल !! 

अखेर ठरले! मुंबई च्या महापौर पदासाठी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौर पदासाठी सेनेचे संजय घाडी यांचे अर्ज दाखल !!

मुंबई

सर्वांनाच उत्सुकता लागून असलेल्या मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) महापौर आणि उपमहापौर पदासाठी अखेर आज भाजप शिवसेना महायुती तर्फे कोणाला संधी दिली जाणार यावरील पडदा दूर झाला असून भाजपाच्या वतीने महापौर पदासाठी नगरसेविका रितू तावडे यांनी अर्ज दाखल केला. तर उपमहापौर पदाकरिता शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक संजय घाडी यांनी अर्ज भरला.

आता बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर निवडणूक पार पडणार आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडून उमेदवार देण्यासाठी मातोश्री वर बैठक सुरू असून शिवसेना ठाकरे पक्षाने उमेदवार दिल्यास महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होईल. मात्र महायुतीकडे निर्विवाद बहुमत असल्यामुळे महायुतीचा महापौर होणार हे निश्चित झाले आहे.

महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज सादर करण्याच्या वेळी मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना शिंदे पक्षाचे सचिव माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. यावेळी महायुतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी उपस्थिती दर्शवून महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

मुंबई महापालिका मुख्यालयातील सचिव विभागात आज सकाळी ११.३० वाजता महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपा शिवसेना शिंदे पक्षाकडून अर्ज भरण्यात आले.

शिवसेना शिंदे पक्षाने उपमहापौर पद हे सव्वा वर्षांपर्यंतचे ठेवले आहे. भाजपाने मात्र अद्यापही महापौर पदाबाबत असा कुठलाही कालावधी ठरविलेला नाही.

महापालिका सचिव विभाग ११ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया दुपारी बारा वाजता सुरू करण्यात येणार असून यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी राहणार आहेत. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *