दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 5 टक्के निधी राखीव-पालकमंत्री जयकुमार रावल
धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यातील २०० हून अधिक दिव्यांग व्यक्तींना रोजगाराची संधी मिळवून देत पहिल्यांदाचा घेण्यात आलेला दिव्यांग रोजगार मेळावा यशस्वी झाला.
धुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुशिक्षित बेरोजगार दिव्यांगासाठी गुरुवार दि. ४ फेब्रुवारी रोजी महारोजगार मेळावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दूरदुष्यप्रणालीद्वारे सहभागी होत मार्गदर्शन केले.

धुळे जिल्ह्यातील दिव्यांग बांधव व विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून सुमारे 37 हजार 257 दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंद घेण्यात आली आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष कृती आराखडा तयार करून 100 दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात येत असून दिव्यांगाच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 5 टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिव्यांग महारोजगार मेळाव्यात दिली.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुशिक्षित बेरोजगार दिव्यांगासाठी महारोजगार मेळावा संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री श्री. रावल दूरदुष्यप्रणालीद्वारे बोलत होते. या रोजगार मेळाव्यास आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त चंद्रकात दुसाने, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मनिष पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बोडके, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, दिव्यांग कल्याण विभाग, जि.प. मालसिंग पावरा, राष्ट्रीय न्यास स्थानिक स्तर समिती, धुळे ॲड. कविता पवार, युथ जॉब फाऊंडेशन ,धुळे महेंद्र पाटील, श्रम व रोजगार मंत्रालयाचे रोजगार मार्गदर्शक वाय.एस.कुशवाह आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, सन 2016 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या संकल्पनेतून समाजातील सर्व घटकांसाठी कार्य करण्याचा निर्धार केला. त्याच अनुषंगाने दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 केंद्र सरकारने पारित केला. त्यानंतर राज्य शासनानेही दिव्यांगासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यात दिव्यांग बांधव व विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून सुमारे 37 हजार 257 दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंद घेण्यात आली आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष कृती आराखडा तयार करून 100 दिवसांचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दिव्यांग बांधवांमध्येही अपार क्षमता, कौशल्य आणि सामर्थ्य आहे. त्यांना योग्य व्यासपीठ, प्रशिक्षण व संधी देणे ही शासनाची जबाबदारी आहे.यापुढे दिव्यांगासाठी सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

आमदार श्रीमती मंजुळा गावित म्हणाल्या की, दिव्यांग मुलांमध्ये अपार गुण, क्षमता आणि सर्जनशीलता असते फक्त त्यांना योग्य संधी, विश्वास आणि पाठबळ मिळण्याची गरज असते व त्यासाठी आपण सर्व कटिबद्ध होऊया. म्हणूनच दिव्यांगांसाठी राखीव असलेला शासनाच्या 5 टक्के निधीचा पूर्ण खर्च करावा. तसेच येत्या अधिवेशनात दिव्यांगासाठी 10 टक्के निधीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, “दिव्यांग म्हणजे ‘दिव्य’ गुण असलेले. शरीराची कमतरता भरून निघते, पण मनाची मोठेपणा जपावा. 19 कंपन्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वार्षिक योजनेतील दिव्यांगासाठीचा 5 टक्के निधी पूर्ण खर्च होईल व गरजेनुसार वाटप केले जाईल.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ. मनिष पवार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी तर जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय यांनी आभार मानले. महारोजगार मेळाव्याची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग मेळाव्यातील स्टॉल्सचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. मेळाव्यात 19 कंपन्यांनी सहभाग घेतला असून, 200 हून अधिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या.सातवी ते पदवीधर शिक्षण असलेल्या १८ ते ३५ वर्ष वयोगटातील दिव्यांगांना सीएससी, कॉम्प्युटर ऑपरेटर, अकाउंटंट, पॅकेजिंग, ऑफिस बॉय, स्टोअर इंचार्ज, हेल्पर, मशीन ऑपरेटर, टेलीकॉर्पोरेटिव्ह एक्झिक्युटिव्ह, बँकिंग सेल्स आदी पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मेळाव्यास मोठया संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.