मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी धुळे जिल्ह्यात नव्याने भूसंपादन प्रक्रिया सुरू

 

धुळे जिल्ह्यात मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी

११८ हेक्टर जमीन भूसंपादनाची प्रक्रीया सुरु

धुळे जिल्हा

केंद्र शासनाचा महत्वकांक्षी मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे प्रकल्पाच्या भुसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. या नवीन रेल्वे मार्गासाठी धुळे जिल्ह्यात आणखी ११८ हेक्टर जमीन भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर पूर्ण करण्यात आली आहे. बाधित जमीन मालकांना प्रचलित नियम आणि अटींनुसार मोबदला देण्यात यावा, यासाठीही प्रशासनाने प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे.

मनमाड-इंदूर या ३६५ किलो मिटर लांबीच्या प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गांतर्गत धुळे तालुक्यातील पुरमेपाडा ते बाळापूर या टप्प्यातील भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पुढे सरकली असून, या संदर्भातील प्राथमिक आकडेवारी स्पष्ट झाली आहे. या रेल्वेमार्गासाठी एकूण नऊ गावांतील शेतजमीन संपादित होणार असून, सुमारे ७८७ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र या प्रकल्पाच्या कक्षेत येत आहे. त्यापैकी सुमारे ११८ हेक्टर क्षेत्र संभाव्य संपादनासाठी निश्चित करण्यात आले आहे.

मनमाड इंदूर रेल्वेमार्ग हा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला थेट जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या मार्गामुळे मालवाहतूक आणि प्रवासी दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर भूसंपादनाची प्रक्रिया ही प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आहे.

मनमाड इंदूर रेल्वेमार्ग प्रत्यक्षात आल्यास धुळे जिल्ह्यासह परिसरातील औद्योगिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे मनमाड-धुळे-इंदूर या रेल्वे मार्गाच्या भुसंपादनाची प्रक्रिया सुरु असून प्रशासनाकडून जमीन मोजणी, हरकती नोंदविणे आणि भरपाई निर्धारणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविली जाऊ शकते. बाधित शेतकरी तसेच जमीन धारकांना मोबदला देण्याची प्रशासनाने तयारी ठेवली असून, तशी चर्चाही वरिष्ठ अधिकार्‍यांशी झाली आहे. ज्यांची जमीन या प्रकल्पांतर्गत येणार आहे, त्या जमीन मालकांची या प्रकल्पाच्या निर्मितीत मोठी ऐतिहासिक भूमिका असेल, अशी माहिती प्रांताधिकारी रोहन कुंवर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *