१०० दिवसांचा ठोस विकास आराखडा निश्चित करून वेगाने कामाला लागा -पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या सुचना
धुळे जिल्हा
दोंडाईचा शहराला पूर्ण विकसित आदर्श शहर बनवण्याचा निर्धार असून, त्यासाठी सुरुवातीचे १०० दिवसांचा ठोस विकास आराखडा निश्चित करून वेगाने कामाला लागा, अशा स्पष्ट सूचना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-वरवाडे नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकासह नगरपालिका प्रशासनाला आज दिल्या.

मंगळवारी दुपारी दोंडाईचा नगरपालिकेची वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृहात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवक आणि पालिका प्रशासन अधिकार्यांची बैठक पार पडली. या बैठकीस नगराध्यक्षा नयनकुवर ताई रावल, उपनगराध्यक्ष जिजाबराव पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख, नगरसेवक बापू देशमुख, मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी तसेच सर्व नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले.
या बैठकीत पालक मंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचा शहरात राबवण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. तसेच सर्व नगरसेवकांना कामा बद्दल सुचना केल्या.
आता सुरुवातीचे शंभर दिवस महत्त्वाचे मानून विकास आराखडा निश्चित करून काम सुरू करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.नगरपालिका क्षेत्रात पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे लावणे व जगवण्याची प्रक्रिया सलग चालू ठेवा. नदी स्वच्छता तसेच शहरांतर्गत स्वच्छता या कडे विशेष लक्ष द्यावे.वीज, पिण्याचे स्वच्छपाणी, या मूलभूत गरजांची उणीव भासणार नाही याची काळजी घ्यावी नगरपालिका प्रशासनाने विकास योजनांची अंमलबजावणी जलदगतीने करावी. नागरिकांची नगरपालिका संदर्भातील कामे वेळेत पूर्ण होतील, याकडे विशेष लक्ष द्यावे. सुरू असलेली सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण असावीत, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात अद्यावत केंद्रीय अभ्यासिका व ग्रंथालय उभारण्यासाठी नियोजन करावे. शहरात संत चौक, सुंदर बगीचा विकसित करण्यासाठी आराखडा तयार करावा.खुले प्राणीसंग्रहालय, प्ले ग्राउंड तसेच नवीन स्मशानभूमी उभारणीसाठी नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दोंडाईचा शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजनांची कामे सुरू असून, ती कामे दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी, असेही मंत्री रावल यांनी सांगितले.