नरडाणा एमआयडीसीमुळे स्थांनिक युवकांना रोजगार मिळणार – पालकमंत्री जयकुमार रावल
ए.आय. तंत्रज्ञानयुक्त 600 मेगावॅट क्षमतेच्या सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचे नरडाणा एमआयडीसीत उद्घाटन
धुळे जिल्हा : Dhule District
धुळे जिल्ह्यातील विकासाला पूरक ठरणारे आणि स्थानिक तरूणांना सक्षम रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योग आता जिल्ह्यातील नरडाणा एमआयडीसीमध्ये सुरू होत आहे. यात आज मोठी भर पडली आहे ती 600 मेगावॅट क्षमतेच्या सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या उद्घाटनाने ! हा सोलर प्लांट (solar panels) ए.आय. तंत्रज्ञानयुक्त अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आला आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी त्याचे रविवारी उदघाटन केले.

जिल्ह्यातील नरडाणा (Nardana MIDC) परिसर आज देशाच्या तसेच जगाच्या औद्योगिक नकाशावर आपली ठळक ओळख निर्माण करीत असून, नरडाणा एमआयडीसीमध्ये उभ्या राहिलेल्या सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या औद्योगिक प्रकल्पांमुळे आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

नरडाणा–बाभळे एमआयडीसी परिसरात अत्याधुनिक ए.आय. तंत्रज्ञानयुक्त व 600 मेगावॅट क्षमतेच्या मयुरेश्वर सोलर एनर्जी या सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटनप्रसंगी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, उपसभापती डॉ. खैरनार, संचालक किशोर पाटील, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सुधाकर गांधीले, अभियंता स्वप्निल पाटील,महावितरणचे कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन, सोना रिओज एनर्जीचे कार्यकारी संचालक अशिष ठाकूर, प्रकल्प संचालिका सुभांगी राजपूत, मंगलसिंग राजपूत, डॉ. वृषाली पवार, मंजुषा ठाकूर, आशिष ठाकूर, प्रल्हाद सैंदाणे, नेहा ठाकूर,राजेंद्र झेंडू महाजन, आर. के. माळी, उपसरपंच भरत ओंकार पाटील, मनोहर ठेलारी, ज्ञानेश्वर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असून, महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या अधिक सक्षम राज्य बनविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे सुमारे 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. नरडाणा एमआयडीसीमध्ये आज दहा हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प उभे राहिले असून, त्यातून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळणार आहे.औद्योगिक विकासाबरोबरच पाणीपुरवठ्याच्या दृष्टीनेही मोठी कामे सुरू असल्याचे सांगत त्यांनी तापी नदीवरील सुरवाडे बॅरेज, जामफळ पाणीपुरवठा योजना व शेतीपर्यंत पाणी पोहचून येत्या तीन ते पाच वर्षांत हा संपूर्ण परिसर 100 टक्के बागायती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा धुळे ते नरडाणा दरम्यान सुरू झाला असून, जिल्ह्यातून सात राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळे जिल्हा सोलर हब म्हणूनही विकसित होत आहे. आगामी काळात सोनगीर येथे रेल्वे स्टेशन उभारले जाणार असून, दिल्ली–मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत सुमारे 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन संपूर्ण परिसराचा कायापालट होणार आहे. मयुरेश्वर सोलर एनर्जी या कंपनीची स्थापना सात महिला उद्योजकांनी एकत्र येऊन हा प्रकल्प उभा राहत आहे. ए.आय. सिस्टीमवर आधारित 600 मेगावॅट क्षमतेच्या सोलर पॅनल व सेल निर्मितीची अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध होणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक युवक-युवतींसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून, परिसराच्या आर्थिक, सामाजिक व औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.