धुळे महापालिकेचे सत्ताधारी होणार कोण ? ३१६ उमेदवारांचे भवितव्य झाले यंत्रात बंद

धुळे

धुळे शहराच्या पुढील पाच वर्षांची सत्ता नेमकी कुणाच्या हाती सोपावायची याचा निर्णय घेऊन आज (दि.१५) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दिवसभरात सुमारे ५४ ते ५५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

३१६ उमेदवारांपैकी ते नशीबवान ७० विजेते कोण ? याचा फैसला आता उद्या होणार आहे. दरम्यान आजचा दिवस काही प्रमाणात तणावात गेला. काही केंद्रात मतदान यंत्र बंद पडले. अनेक ठिकाणी वाद आणि प्रभाग १८ मध्ये हाणामारी झाली. तृतीयपंथी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गैरप्रकाराचे आरोप केले.

धुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात मतदानाची वेळ होती. महानगरपालिकेच्या १९ प्रभागांतील एकूण ७४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यापैकी चार जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने त्या ठिकाणी मतदान झाले नाही. उर्वरित ७० जागांसाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. या मतदानातूनच महापालिकेतील सत्तासमीकरण ठरणार आहे.

यावेळी निवडणुकीत एकूण ३२० उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी चार उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित ३१६ उमेदवारांचे भवितव्य आज मतदारांनी मटपेटीत बंद केले. शहरात एकूण ५०९ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्रे ठेवण्यात आली होती.

दरम्यान, आज दिवस भरात काही ठिकाणी वाद , हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. प्रभाग क्रमांक १८ मध्ये दोन गटात वाद होऊन थेट मतदान यंत्र तोडफोड करण्यात आले. यामुळे सुमारे 2 तास त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती.


शिवसेनेचे उमेदवार आणि जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी  भाजपचे प्रवीण अग्रवाल, विक्की परदेशी यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला, येथे भाजप आणि शिवसेना समर्थकांनी जोरदार वाद केले अशी माहिती समोर येत आहे.

एकूण प्रभागापैकी प्रभाग क्रमांक आठ मध्ये तब्बल २३ उमेदवार रिंगणात असल्याने तेथे तीन मतदान यंत्रांची विशेष व्यवस्था करण्यात आली. निवडणुकीसाठी एकूण १० हजार १९ मतदान यंत्रांचा वापर झाला. ऐनवेळी संभाव्य तांत्रिक अडचण लक्षात घेता काही अधिकची यंत्रे राखीव ठेवण्यात आली होती. मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त उभारला. शहरातील १३ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आल्याने  कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाच हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले.

एकूण प्रभाग : १९
एकूण जागा : ७४
बिनविरोध जागा : ४
प्रत्यक्ष मतदानाच्या जागा ७०

एकूण उमेदवार : ३२०
बिनविरोध निवडून आलेले : ४
 रिंगणातील उमेदवार : ३१६

मतदान केंद्रे : ५०९
मतदान यंत्रे: १०१९
संवेदनशील मतदान केंद्रे : १३
पोलीस बंदोबस्त : पाच हजार अधिकारी व कर्मचारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *