धुळे शहर
महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आता चार दिवस उरले असून, प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी रविवारी धुळ्यात वखार महामंडळाच्या गोडाउनमध्ये २ हजार मतदान यंत्रे (बॅलेट यूनिट) आणि १ हजार कंट्रोल युनिट निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सील करण्यात आले.
धुळे महापालिकेत ७४ जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी ४ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ७० जागांसाठी ३२० उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. ५०७ मतदान केंद्रावर मतदान केले जाणार आहे त्यावर साधारणपणे ३ हजार कर्मचारी नियुक्त केले आहे. एका मतदान केंद्रावर ५ कर्मचारी नियुक्त राहणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, ६ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रभागनिहाय मतपत्रिका लावण्याचे काम पूर्ण झाले. मतदान प्रक्रियेसाठी ३ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून ५०७ केंद्रांवर मतदान पार पडणार आहे.

उमेदवारांना प्राधान्यक्रम
महापालिका निवडणूकीत मतदान यंत्रात उमेदवारांची नावांचा क्रम देताना त्यात आडनाव त्यानंतर राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्ष, राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष, दुसऱ्या राज्यातील निवडणूक आयोगाकडे नोंदणी व अपक्ष या क्रमाने उमेदवारांचे नाव मतदान यंत्रात राहणार आहे.
चार रंगात मतपत्रिका
मतदान यंत्रातील मतपत्रिकेत एका प्रभागातील चार भाग अ, ब, क, ड साठी वेगवेगळे रंग आहे. यात ‘अ’ भागासाठी पांढरा रंग, ‘ब’ साठी फिका गुलाबी रंग, ‘क’ साठी फिका पिवळा रंग व ‘ड’साठी फिका निळा रंग आहे.
एका यंत्रात १५ उमेदवारांची नावे
मतदान यंत्रात मतपत्रिका लावण्यात आल्या. ७४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यात एका मतदान यंत्रात १५ उमेदवारांची नावे आहे. त्यात नोटा या बटणाचाही समावेश आहे. उमेदवारांची संख्या जास्त असल्यास यंत्र वाढविण्यात आली आहे.