‘एमआयएम’च्या सभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा
मा.आ.फारूक शाहांवर ही ओवैसींचा हल्लाबोल
धुळे शहर
मनपा निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि महायुतीतल्याच घटक पक्षांमध्ये जुंपलेली असतानाच दुसरीकडे एमआयएमच्या ओवैसींनी धुळ्यात काँग्रेसवर जोरदार निशाणा साधून अल्पसंख्यांक समुदायाला काँग्रेस पासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मुस्लिम समाजासाठी भाजप जसा धोकादायक आहे, तसाच धोका काँग्रेसनेही आजवर दिल्याचा आरोप ओवेसींनी धुळ्यात घेतलेल्या जाहीर सभेत केला. धुळे महापालिका निवडणुकीत एम आय एम चे किमान १५ नगरसेवक निवडून येतील असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी आजी आमदार फारूक शाह यांच्या वर सुद्धा जोरदार निशाणा साधला. विधानसभेला जी ७० हजार मते मिळाली ती एम आय एम च्या समर्थकांनी दिली ती काही फारूक शाह ची वोट बँक नव्हे अश्याप्रकारचा दावा सुध्दा खासदार ओवेसी यांनी केला.

धुळ्यात गुरुवारी सांयकाळी झालेल्या जाहीर सभेत खा. असुद्दीन ओवेसी म्हणाले की, ज्या रासुका कायद्यामूळे दोन तरुण मुले साडे पाच वर्षापासून तुरुंगात आहेत हा कायदा बनवणारे लोक काँग्रेस वाले होते. डॉक्टर मनमोहन सिंगच्या सरकारने हा कायदा बनवला. 2019 मध्ये अमित शाह यांनी हा कायदा आणखी कडक केला. काँग्रेस ने बनवलेले कायदे आज मोदींना मदत करत आहेत. अमित शाहने जो कायदा आणला आम्ही त्याच्या विरोधात मतदान केलं. काँग्रेसचा कोणी नेता स्वातंत्र्यानंतर कधी दोन ते पाच वर्ष तुरुंगात राहिला आहे का? मी जर काँग्रेसवाल्याविरोधात बोलायला सुरुवात केली तर हे मुकाबला नाही करू शकणार. 1962 जम्मू-काश्मीरमध्ये दंगे झाल्यावर त्यावेळेसच्या पिडितांना बांगलादेशमध्ये ढकलल गेलं. आज मुसलमान दिसला की त्याला बांगलादेशी म्हणतात. आज मोदी देखील काँग्रेसच्या पॉलिसीवर काम करत आहेत. असे म्हणतपंतप्रधान नरेंद्र मोदींवर असुद्दीन ओवेसी यांनी जोरदार टीका केली.

मुंबईच्या रेल्वेत बॉम्बस्फोट झाला. या घटनेत अकरा मुसलमानांना पकडले गेले. 19 वर्ष ते लोक तुरुंगात होते. कोणाचे सरकार होते त्यावेळेस काँग्रेस सत्तेत होती. हायकोर्टाने सांगितलं हे 11 लोक बेकसुर आहेत. काय गुन्हा होता त्यांचा, मुंबई मधल्या मुसलमानांना एटीएस ने टॉर्चर केले. या अन्याय विरुद्ध तुम्हाला उभं राहावं लागेल यासाठी तुम्हाला धुळ्यामध्ये महापालिकेत एमआयएमचे उमेदवारांना निवडून द्याव लागेल असे आवाहन केले.
पुढील पाच वर्षात पुन्हा एकदा धुळे मालेगाव संभाजीनगर विदर्भामध्ये पुन्हा एकदा एमआयएम चे आमदार निवडून येतील. कोणाला असं वाटत असेल की त्यांच्या जाण्याने एमआयएम कमजोर झाली, त्यांना वाटत असेल की मी आहे तर एम आय आहे तर तो त्यांचा गैरसमज आहे. असे म्हणत खा. ओवेसी यांनी माजी आमदार फारुक शाह यांच्यावर निशाणा साधला. लोकसभेच्या निवडणुकीत इम्तियाज जलील 1200 मतांनी हारले, ते आजही एमआयएम मध्ये खंबीरपणे उभे आहेत. या महापालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणूक लढत आहे, अजित पवार शरद पवारांचे नाही झाले तर इतरांचे काय होणार ? अशी टीका अजित पवारांवरती असुद्दिन ओवेसी यांनी केली.
मुंबईत एकाच पार्लमेंट मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसतात एकनाथ शिंदे बसतात आणि अजित पवार देखील बसतात. फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे. येणाऱ्या पाच वर्षात पुन्हा एकनाथ शिंदे राहतील ना अजित पवार राहील तर फक्त एम आय एम राहील. महायुतीतले पक्ष लोकांसोबत तमाशा करत आहेत. तुमचा सत्तेतला बाप जरी आला तरी एम आय एम चे उमेदवार मागे हटणार नाहीत. म्हणून पंधरा तारखेला एमआयएमच्या उमेदवारांसमोरचा बटन दाबा यावेळेस धुळ्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात 16 तारखेच्या निकालात पतंग उडताना दिसेल असा दावा सुद्धा खासदार असुद्दीन ओवेसी यांनी केला.