
धुळे शहर
धुळ्यातील गुंडगिरी आणि ढासळलेली कायदा-सुव्यवस्था यावर मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत ते गप्पच राहिले, शहराचे आमदार ‘एक दिवसाआड पाणी येते’ असे चक्क खोटे बोलले. भाजपच्या सभेची अशी चिरफाड करीत ठाकरे सेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
धुळ्यात वाढलेल्या गुंडगिरीला सत्ताधारी भाजपाचा उघड पाठिंबा असून, एकाच आठवड्यात शहरात घडलेल्या दोन गोळीबाराच्या घटनांनंतरही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक शब्दही न काढणे हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असल्याचा आरोप शिवसेना नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
धुळे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असताना, शीख समाजाचे पवित्र गुरुद्वारा रक्तलांछित होणे आणि गोळीबारासारख्या घटना घडूनही मुख्यमंत्री कायदा व सुव्यवस्थेवर बोलले नाहीत, याचा अर्थ भाजपाने गुंडगिरीला मूकसंमती दिली असल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे. धुळे शहरात जणू रामराज्य असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वस्तुस्थिती वेगळी असल्याचे त्यांनी नमूद केले.
पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना व इतर योजनांवर आतापर्यंत ३०९ कोटी रुपये खर्च होऊनही शहरातील अनेक भागांमध्ये आठ ते दहा दिवस पाणी येत नसल्याची स्थिती आहे. याच कारणामुळे भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांना महापालिकेत आयुक्तांना घेराव घालावा लागला, हे सत्ताधाऱ्यांचे अपयश दर्शवते, असे त्यांनी म्हटले. मात्र शहराचे आमदार ‘एक दिवसाआड पाणी येते’ असे खोटे बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्या भाषणात हिंदुत्वाचा दाखला देत मंदिर पाडणारे पाहिजेत की बांधणारे, असा प्रश्न उपस्थित केला. मात्र दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासमोरील प्राचीन हनुमान व शंकर मंदिर पाडल्याची घटना संपूर्ण देशाने पाहिली आहे. जेसीबी आणि पोकलॅन्डच्या सहाय्याने मूर्ती ओढून पाडण्यात आल्या, हे विसरून भाषणबाजी करण्यात आली, असा घणाघात गोटे यांनी केला.
भाजपाच्या कथित हिंदुत्वावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अकोट नगरपालिकेत भाजपाने एमआयएम पक्षाशी युती केली, तर अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत आघाडी केली. सत्तेसाठी कोणाशीही हातमिळवणी करणाऱ्यांनी हिंदुत्वावर बोलू नये, अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री भाषणाला सुरुवात करताच सभेत बसवलेल्या भाडोत्री महिला उठून जात असल्याचे चित्र दिसले. पगारी कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र सभेतील उदासीनता स्पष्टपणे जाणवत होती, असा टोला गोटे यांनी लगावला.
धुळ्यातील गुंडगिरी, पाणीटंचाई आणि ढासळलेली कायदा-सुव्यवस्था यावर मुख्यमंत्री व सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी करत हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप अधिक गंभीर ठरत असून, धुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा आगामी महापालिका व इतर निवडणुकांमध्ये केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाने विकास आणि सुशासनाचे दावे केले असले तरी प्रत्यक्षात शहरातील गुन्हेगारी, पाणीटंचाई आणि अस्वस्थता वाढत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत मतदार सत्ताधाऱ्यांना जाब विचारतील आणि धुळे शहरातील वास्तव परिस्थितीचा हिशेब मागतील, असा विश्वास गोटे यांनी व्यक्त केला आहे.