स्वस्थ नारी- सशक्त परिवार अभियानात धुळे जिल्ह्यात २७ हजार महिलांची तपासणी

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ‘स्वस्थ नारी- सशक्त परिवार’ अभियानात आतापर्यंत २७ हजार १६८ महिलांची तपासणी करण्यात आली असून जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयस्तरावर १ हजार ६६८ रुग्णांची तज्ञांकडून तपासणी होऊन त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली आहे.

‘सशक्त स्त्री- सशक्त परिवार- सशक्त समाज’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान जिल्ह्यातील ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २३२ उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामस्तरावर राबविण्यात येत आहे. आतापर्यंत या अभियानात २७ हजार १६८ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयस्तरावर १ हजार ६६८ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येत आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्यविषयक गरजांवर विशेष लक्ष केंद्रीत करून त्यांना मोफत आरोग्य सेवा आणि मार्गदर्शन पुरविण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये महिलांच्या २० प्रकारच्या तपासण्या केल्या जात आहेत. त्यामध्ये गर्भवती माता तपासणी, मधुमेह तपासणी, दंत आरोग्य तपासणी, कर्करोग तपासणी, क्षयरोग, सिकलसेल तपासणी, रक्तक्षय तपासणी, पोषण व आहार सल्ला, गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आहार मार्गदर्शन, मुलांसाठी पोषण, मासिक पाळी स्वच्छता, माता बाळ सुरक्षा, आभा कार्डचे वितरण, सिकलसेल कार्ड वितरण, रक्तदान शिबिर, अवयवदान नोंदणी आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या शिबिराच्या माध्यमातून ‘नारी आरोग्य म्हणजेच परिवाराचे आरोग्य’ हा संदेश घरोघरी पोहोचविला जात आहे. जिल्ह्यातील महिलांनी आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री ‍विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *