मुंबई
राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. या आदेशानुसार निवडणूक आयोगाने राज्यात जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रारूप प्रभाग रचना करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदांचे गट तसेच पंचायत समितीचे गण निश्चित करण्यात आले आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल.