एबी फाउंडेशन, महापालिकेतर्फे आयुष्यमान कार्डचे मोफत वितरण आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
धुळे शहर
शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संकल्पनेतील एबी फाउंडेशन, महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य हमी सोसायटी, धुळे महापालिका व धुळे जिल्हा परिषदेतर्फे आरोग्याचा श्रीगणेशा ही विशेष मोहीम राबविण्यास प्रारंभ झाला आहे. 13 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या विशेष मोहिमेत शहरातील नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड व आयुष्यमान वय वंदना कार्ड तयार करून देण्यासह त्याचे वाटप करण्यात येत आहे. या विशेष उपक्रमाचा धुळेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एबी फाउंडेशनने केले आहे.
साडेपाच लाख कार्डवाटपाचे उद्दिष्ट
आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून 2018 पासून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ राबविली जाते. देशातील कोट्यवधी लोक या योजनेत सहभागी झाले आहेत. त्यांना सरकारकडून आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड देण्यात आले आहे. या योजनेतून लाभार्थ्याला 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. तसेच राज्य शासनातर्फे महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत प्रतिकुटुंब दर वर्षी दीड लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण दिले जाते आणि हे एकात्मिक आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट आहे. याशिवाय 70 वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र शासनातर्फे आयुष्यमान वय वंदना योजनेंतर्गत विविध रुग्णालयांत वैद्यकीय सेवेचा लाभ दिला जातो. अजूनही ज्यांचे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड अथवा 70 वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यमान वय वंदना कार्ड तयार झालेले नाही, ज्यांना कार्ड मिळविण्यात अडचणी, समस्या येत आहेत अशा धुळे शहरातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवून हे कार्ड तयार करून देण्यासह त्यांचे वाटप करण्यात येत आहे. शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त 27 ऑगस्टपासून ही विशेष मोहीम सुरू झाली असून, ती 13 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड व आयुष्यमान वय वंदना कार्ड योजनेंतर्गत एक हजार 356 आजारांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत आरोग्यसेवेसाठी दोन हजार 300 हून अधिक अंगीकृत रुग्णालये समाविष्ट आहेत. शहरातील साडेपाच लाखांहून अधिक नागरिक या योजनेपासून अजूनही वंचित आहेत. त्या सर्वांना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ४४ हजारांवर कार्ड तयार झाले आहेत.
मोहिमेसाठी आशा वर्कर्स, स्वयंसेवक सज्ज
वंचित नागरिकांना आयुष्यमान कार्ड बनवून देण्यासाठी धुळे महापालिका, धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 150 आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, तसेच 150 स्वयंसेवक राबत आहेत. तसेच हे कार्ड तयार करण्यासाठी 150 सीएससी सेंटर, 26 अंगीकृत रुग्णालयांचेही सहकार्य लाभत आहे. धुळे शहरातील आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड व आयुष्यमान वय वंदना कार्डपासून वंचित धुळेकर नागरिकांनी या दोन्ही योजनांचा लाभ मिळावा यासाठी 13 सप्टेंबरपर्यंत शासकीय कार्यालयांतील मदत कक्ष, आशा स्वयंसेविका, स्वस्त धान्य दुकान, आपले सरकार सेवा केंद्र योजनेची अंगीकृत रुग्णालयांशी संपर्क साधावा. ही दोन्ही कार्ड बनविण्यासाठी अद्ययावत शिधापत्रिका, आधार कार्ड व आधार क्रमांकाला संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
धुळेकरांनो, यांच्याशी साधा संपर्क
शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त 27 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरदरम्यान आरोग्यची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड, आयुष्यमान वय वंदना कार्ड तयार करण्यासाठी एबी फाउंडेशनचे समन्वयक आरोग्यदूत कमलेश देवरे (मोबाईल- 8055556990), योजनेचे समन्वयक दत्ता पारखे (मोबाईल- 9284704832), समीर सर (मोबाईल- 9823342586), सुभाष मोरे (मोबाईल- 9370014275), योगेश चौधरी (मोबाईल- 9921648252) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एबी फाउंडेशन, धुळे महापालिका व जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.