धुळे शहर
देवपुरातील विद्यानगर येथील शिवशंभो प्रतिष्ठानतर्फे प्रथमच दत्तमंदिर चौकात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार गणेशोत्सवाच्या काळात दहाही दिवस प्रतिष्ठान व अमळनेरच्या स्पार्क फाउंडेशनतर्फे भारतीय पुरातन दुर्मिळ शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहित देसले यांनी मंगळवारी (दि. 26) केशरानंद गार्डन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
श्री. देसले म्हणाले, की आज शालेय अभ्यासक्रमात संपूर्ण इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना दिली जात नाही. शस्त्राबद्दल फारसी माहिती नसते. त्यादृष्टीने मंडळाने विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती व्हावी, यासाठी हे प्रदर्शन भरविले आहे. त्यात तलवारीपासून मूठ व अन्य साहित्याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
250 पेक्षा अधिक शस्त्र आणि साहित्याचे हे प्रदर्शन असणार आहे. याशिवाय बेटी बचाव, बेटी पढावच्या संयोजिका अल्पा अग्रवाल यांच्या सहकार्यातून याठिकाणी पथनाट्य 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात सायंकाळी साडेसात वाजता सादर केले जाणार आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) संदर्भातही मार्गदर्शन करून मुलींना आपली सुरक्षा एआयच्या माध्यमातून कशी करता येऊ शकते याची माहिती देण्यात येणार आहे. तसेच पावनखंड हे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. धुळेकर नागरिकांनी या शस्त्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले. भविष्यात शिवसंभो ग्रंथालय उभारण्याचाही मानस पदाधिकार्यांनी व्यक्त केला. शहरासह ग्रामीण भागातील काही शाळांसाठी रात्री शक्य नसेल, त्यांच्यासाठी सकाळच्या सत्रात हे शस्त्रप्रदर्शन केले जाईल. इच्छुक शाळा व्यवस्थापनाने मंडळाशी संपर्क साधल्यास तशी सुविधा उपलब्ध केली जाईल, असेही श्री. देसले यांनी सांगितले.
प्रतिष्ठाने उपाध्यक्ष कुणाल सोनवणे, सचिव श्यामसुंदर पाटील, स्पार्क फाउंडेशनचे हभप नानासाहेब महाराज, भावेश शर्मा, वैभव विश्वभर आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.