‘एनआरएचएम’ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप धुळे जिल्ह्यात आरोग्यसेवेचे कामकाज प्रभावीत

धुळे जिल्हा

शासकीय सेवेत नियमित समायोजन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी/कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्रच्या वतीने आजपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. संपात सामिल अधिकारी, कर्मचार्‍यांनी धुळे शहरातील क्युमाईन क्लब येथे धरणे आंदोलन सुरु केले. एकत्र येत सर्वांनी घोषणाबाजी करीत निदर्शेने केली.

धुळे जिल्ह्यातील शेकडो कंत्राटी कर्मचारी यात सहभागी झाल्याने आरोग्यविषयक कामकाज प्रभावीत झाले आहे.


१४ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समायोजित करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला आहे. परंतु सव्वा वर्ष होऊनही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. शिवाय मानधनवाढही देण्यात आलेली नाही. बदली धोरण, इपीएफ, इन्शुरंस इत्यादी मागण्याही मंजूर झालेल्या नाहीत. यासंदर्भात ८ व १० जुलै २०२५ रोजी आरोग्य मंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.

या आंदोलनात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल, समुपदेशक, वॉर्डबॉय व अन्य कर्मचारी सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांतर्गत सर्व अहवाल देणे बंद,लसीकरणासह ऑनलाईन व ऑफलाईन कामेही बंद ठेवण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी एकीकरण समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल वारुळे, श्रीमती अमिता आकवले, निलेश पाटील, रुपाली मॅडम, सरीता पाटील, कपिल जाधव, राजीव भामरे, नरेश बोरसे, अजय पाटील, संभा महाजर व इतर अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.

दरम्यान, ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात हिवताप, डेंग्यू व अन्य साथीच्या आजारांनी डोके वर काढले असताना कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलन सुरु केल्याने आरोग्य व्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *