धुळे महापालिकेवर भाजपचा ध्वज फडकविण्यासाठी सज्ज होऊया पालकमंत्री रावल : भाजपची महानगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

धुळे शहर

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सारे अनेक वर्षांपासून सोबत काम करत आहोत. आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात सरकारच्या माध्यमातून आपण धुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प साकारत आहोत. शहरात अनेक विकासकामे सुरू आहेत. त्यातून सर्वांच्या स्वप्नातील सुंदर शहर बनविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वी झालेल्या चुका टाळत प्रत्येकाच्या योगदानातून शहर-जिल्हा भगवामय झाला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांवर नवनवीन जबाबदाऱ्या सोपवून त्यांच्या कार्यक्षमतेला वाव दिला जात आहे. याच संघटनात्मक बळावर आगामी महापालिका निवडणुकीतही एकतर्फी भाजपचा ध्वज फडकविण्यासाठी सज्ज होऊया, निकोप स्पर्धेतून काम करूया, असे आवाहनही राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

 

आमदार अनुप अग्रवाल यांच्या मालेगाव रोडवरील जनसंपर्क कार्यालयात आज सायंकाळी भारतीय जनता पक्षाची महानगर जिल्हा कार्यकारिणी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी जाहीर केली. यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री रावल यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले, त्यावेळी मंत्री रावल बोलत होते. आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, जयश्री अहिरराव, वैशाली शिरसाट, बेटी बचाव-बेटी पढावच्या प्रदेश संयोजिका अल्पा अग्रवाल, ज्येष्ठ नेते हिराण गवळी, विजय पाच्छापूरकर, लाडकी बहीण योजनेच्या संयोजिका किरण कुलेवार, भगवान गवळी, नरेश चौधरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले, की आज पक्षाच्या कार्यकर्त्यांवर नवीन जबाबदारी सोपविली गेली आहे. यामध्ये ज्यांना पद मिळाले नाही त्यांनी नाराज होण्याजी गरज नाही. पक्षाच्या विविध आघाड्यांच्या विस्तारित कार्यकारिणीत प्रत्येकाला संधी दिली जाईल. प्रत्येकाचा मान-सन्मान जोपासला जाईल. माणूस पदाने नाही, तर आपल्या कार्याने मोठा होतो. पक्षात आपल्याला सर्वांच्या साथीने, योगदानाने धुळे शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे. शहरात अनेक विकासकामे सुरू आहेत. भविष्यात अनेक योजना, प्रकल्प सुरू होत आहेत. यातून प्रत्येक धुळेकराच्या स्वप्नातील सुंदर आणि विकसित शहर बनविण्याचा संकल्प करूया. ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. चुकीच्या प्रथा, पायंडे मोडीत काढून भरीव आणि ठोस कामे करण्यासाठी हेवेदावे बाजूला सारूया. आतापर्यंत पक्षाच्या यशात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे, कौतुकास्पद राहिले आहे. याच ताकदीच्या जोरावर, लाडक्या बहिणींच्या साथीने आपण आगामी निवडणुकीत धुळे महापालिकेवर भगवा ध्वज फडकवूया, ही जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याची धमक आपण सारे मिळून दाखवूया, असे आवाहनही मंत्री रावल यांनी केले.


प्रभागातील जनतेपर्यंत पोहोचा : आमदार अग्रवाल
आमदार अग्रवाल म्हणाले, की पक्षात पदे मोजकी आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. आज फादर बॉडी जाहीर झाली आहे. अजून बऱ्याच कार्यकारिणी जाहीर व्हायच्या आहेत. त्यात प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाने सामावून घेतले जाईल. त्यामुळे कोणीही नाराज होऊ नये. पद असो अथवा नसो, आपण प्रामाणिकपणे काम करत राहिलो, तर पक्ष त्याची नक्कीच दखल घेतो आणि न्यायही देतो. पदाची गरिमा ठेवून पक्षाची ध्येयधोरणे व पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवा. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागातून पक्षाकडून १५ ते २० जण इच्छुक आहेत. यात निवडक इच्छुकांनाच उमेदवारी मिळेल. यामुळे प्रत्येकाने आपापल्या प्रभागात निष्ठेने काम करा. जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करा. त्याचे चीज होईल. कारण पक्षाकडून होणाऱ्या सर्वेक्षणात जनतेकडून जी नावे पुढे येतील त्यांनाच संधी मिळेल. कुठलीही वशिलेबाजी होणार नाही. येणारा काळ आपलाच आहे. त्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी आणि धुळे महापालिकेवर भाजपचा ध्वज फडकविण्यासाठी सज्ज व्हावे. निवड झालेल्या कार्यकारिणीचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.

भाजपची महानगर जिल्हा कार्यकारिणी 

सरचिटणीस- ओमप्रकाश खंडेलवाल, शशिशेखर मोगलाईकर, पवनकुमार जाजू, सुनील कपिल. उपाध्यक्ष- यशवंत येवलेकर, जितेंद्र चौवटिया (शहा), डॉ. राहुल भामरे, राजेंद्र खंडेलवाल, प्रा. सागर चौधरी, पृथ्वीराज पाटील, अजय अग्रवाल, दिलीप शितोळे. चिटणीस- संदीप बैसाणे, योगिता बागूल, कमलाकर पाटील, सुनील विसपुते, सुबध पाटील, शेखर कुलकर्णी, जितेंद्र धात्रक, शरद चौधरी. कोशाध्यक्ष- अजय (राम) अग्रवाल. कार्यालय प्रमुख- प्रकाश उबाळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *