बंद असलेले भांडीवाटप लवकरच सुरू करणार ! आमदार अग्रवाल यांना कामगारमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई

तब्बल दोन ते अडीच महिन्यांपासून बांधकाम कामगारांना ठप्प झालेले भांडीवाटप तातडीने पुन्हा सुरू करावे, अशी आग्रही मागणी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे केली. यावर याबाबत उद्‌भवलेल्या तांत्रिक अडचणींवर पर्याय काढून लवकरात लवकर रखडेलेले भांडीवाटप सुरू करण्याची ग्वाही मंत्री फुंडकर यांनी दिली.

धुळे शहरातील बांधकाम मजूर व कामगारांना शासकीय योजनेंतर्गत आमदार अनुप अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चातर्फे नियोजन करत भांडीवाटप करण्यात येत होते. आतापर्यंत शहरातील सुमारे पाच हजारांहून अधिक कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना भांड्याचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, दोन ते अडीच महिन्यांपासून हे भांडीवाटप ठप्प झाले होते. यामध्ये शासन स्तरावर सॉफ्टवेअर अपडेटची कार्यवाही सुरू असल्याने तांत्रिक अडचणींमुळे हे वाटप थांबले होते.

या पार्श्वभूमीवर कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची गरज लक्षात घेत, त्यांच्या प्रती असलेल्या जाणिवेच्या अनुषंगाने आमदार अनुप अग्रवाल यांनी नुकतीच कामगारमंत्री आकाश फुंडकर यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी बांधकाम मजुरांसह कामगारांना होणारे भांडीवाटप थांबल्याने बांधकाम मजूर व कामगारांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार यांनी आमदार अग्रवाल यांच्यासह मंत्री फुंडकर यांना धुळे शहरासह राज्यभरातील भांडी वाटप कार्यवाहीची माहिती देत थांबलेले भांडीवाटप लवकरात लवकर सुरू करण्याची आग्रही मागणी केली. यावर सकारात्मक चर्चा होऊन कामगारमंत्री फुंडकर यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील बांधकाम मजूर, कामगारांना होणारे भांडीवाटप थांबले होते. या अडचणी लवकरात लवकर सोडवून पुन्हा भांडीवाटप सुरू करण्याचे आश्वासन आमदार अग्रवाल यांच्यासह भाजप कामगार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी भाजप कामगार मोर्चाचे भटू गवते, अमित भोसले, जयेश वावदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *