धुळे जिल्हा
जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती, शिरपूर दिवाणी व फौजदारी न्यायालय, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमान बोराडी ग्रामपंचायत कार्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश पूजा कोकाटे होत्या. तर प्रमुख पाहुणे गट विकास अधिकारी प्रदीप पवार, पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संगठनचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे, सरपंच सुकदेव भिल, सहाय्यक गट विकास अधिकारी आर.के.गायकवाड, धुळे-नंदुरबार ग.स. बँकेचे संचालक शशांक रंधे, शिरपूर वकील संघाचे सचिव अॅरड. एन.ए. चव्हाण, अॅळड.एस.बी.पाटील, अॅधड श्रीमती. पी.एस.गुरव, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.निता सोनवणे, एस.एस.पवार, अंगणवाडी पर्यवेक्षिका रंजना पावरा, कांती पावरा, ग्रामपंचायत सदस्य हरी पावरा,भरत पावरा,पोलीस पाटील अनिल पावरा, अंगणवाडी सेविका, बचत गट कार्यकर्ते,मातोश्री बनुमाय कन्या विद्यालय,फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थीनी, परिसरातील आदिवासी महिलावर्ग पारंपारिक वेशभुषेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाणी न्यायाधीश पुजा कोकाटे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व यासाठी आहे की, मानलेल्या गुरुला अंगठा देणारा, पर्यावरण रक्षण करणारा, संस्कृती जपणारा आदिवासी बांधव आहे. 1994 साली राष्ट्रसंघाने आदिवासी दिवस जाहीर केला. यानिमित्त प्रबोधन करुन आदिवासी समाजाला मुळ प्रवाहात आणावे अशी संकल्पना आहे. आपली संस्कृती जपण्याचा अधिकार घटनेत आहे. हा मुलभुत हक्क असुन आपली संस्कृती जोपासायला हवी. यासाठी आदिवासी समाजाने व्यसनापासून दुर राहणे महत्वाचे आहे. व्यसनामुळे कुटुंब, समाजाचे नुकसान होते. तसेच बालविवाह करायला नको, योग्य वयातच विवाह करावा. बालवयात शारिरीक मानसिक विकास झालेला नसतो. तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावरच विवाह केला पाहिजे. आदिवासी समाजाने उत्थानासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे. यामुळे आयुष्यातील सर्व समस्या सुटतात, तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंगीकार करायला हवा असे आवाहन केले. यावेळेस त्यांनी फक्त लढ म्हणा ही वि.वा.शिरवाडकर यांची कविता सादर केली.
विधिज्ञ ॲड.श्रीमती पी.एस.गुरव यांनी सांगितले की, आदिवासी समाजाने जगाला भाषा दिली आहे. सर्व भाषांचे मुळ आदिवासी भाषेत आहे. आदिवासी संस्कृतीने जगाला चित्रकला वारली शैली, संगीत, नृत्य इ.देणगी दिली आहे. शेतीचा शोध आदिवासी स्रियांनी लावला आहे. म्हणून याहामोगी मातेच्या यात्रेत रोपांची पुजा केली जाते. आदिवासी संस्कृती मातृसत्ताक आहे. समतेला खुप महत्व आहे. लग्नकार्यात व इतर समारंभात स्री-पुरुषांना बरोबरीचे स्थान आहे. आदिवासी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या शिक्षण, वनपट्टा, सामाजिक, पेसा अशा अनेक योजना आहेत, त्यांचा लाभ घ्यायला हवा असे त्यांनी सांगितले.
विधिज्ञ एस.बी.पाटील यांनी हुंडा कायद्याबाबत माहिती देतांना म्हणाले की, हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 यावर्षी लागु करण्यात आला. यानुसार हुंडा घेणे-देणे गुन्हा आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पद्धतीनेही हुंडा दिला जातो. अनेकदा महिलांचा छळही केला जातो. त्यासाठी कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. हुंड्याची प्रथा बंद होण्यासाठी समाजातील जेष्ठ व्यक्तींनी प्रयत्न करायला हवा. प्री वेडींग शूटींग हा सुद्धा चुकीचा प्रकार आहे असे गैरप्रकार बंद करावेत असे सांगितले.
शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.निता सोनवणे यांनी स्त्री भ्रूण हत्येबाबत जनजागृती करतांना सांगितले की, स्त्रीच्या गर्भातील स्री भ्रूण तपासुन गर्भपात केला जातो. याला परावृत्त करण्याचे काम केले पाहिजे. भ्रूणहत्या मुलगा असावा असा अट्टाहास, मुलींची सुरक्षितता,आर्थिक किंवा अनेक कारणांमुळे होते. यासाठी 1994 व इतर अनेक कायदे प्रतिबंधासाठी आहेत. अनेक ठिकाणी स्रीभृण हत्यामुळे स्री जन्मदर कमी झाला आहे. समाजाचा समतोल राखण्यासाठी स्त्रीभ्रूण हत्या टाळणे आवश्यक आहे. याबरोबरच बालविवाह, अत्याचार, छळ इ. समस्या आहेत. आदिवासी समाजात कायद्याने मुलींना हिस्सा नाकारला जातो यासाठी बदल व्हायला हवा. अनेक आरोग्यविषयक समस्या स्रीया सांगत नाहीत यामुळे अनेक आजार वाढतात. स्त्रीभ्रूण हत्या जगाला लागलेली कीड आहे. ती सुशिक्षित स्रीयांनी संपवायला हवी असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गजु पाटील, चंद्रसिंग राजपुत, गणेश भामरे, उमेश पावरा, मुकेश जाधव, बादल पावरा, भुषण कुलकर्णी, सना पावरा यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन डी.वाय.कोळी यांनी तर आभार शिरपूर वकिल संघाचे विधीज्ञ समाधान भवरे यांनी मानले.