अंजली दमानिया हाजीर हो… शिरपूर न्यायालयाचा वॉरंट

एकनाथ खडसे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य प्रकरण 
अंजली दमानिया हाजीर हो…
शिरपूर न्यायालयाचा वॉरंट

धुळे जिल्हा

माजी महसूल मंत्री तथा तात्कालिक भाजप नेते एकनाथराव खडसे यांची मानहाणी आणि अब्रूनुकसान केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना शिरपूर न्यायालयाने २३ सप्टेंबर २०२५ पर्यंत हजर होण्याचे आदेश (जामीनपात्र वॉरंट) दिले.

सहाय्यक प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती हुस्ना खान यांनी एक ऑगस्ट रोजी हा आदेश जारी केला आहे.

या प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी- २०१६ ते २०१९ दरम्यान अंजली दमानिया यांनी तत्कालीन भाजपा नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध आरोप केले होते.यात प्रामुख्याने पुणे येथील जमीन खरेदी,खडसे यांचे वाहन आणि आर्थिक अनियमितता याच्यासह अन्य प्रकरणांचा समावेश होता.दमानिया यांनी खडसे यांच्यावर केलेले आरोप वेगवेगळ्या समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची मानहाणी झाली अशी भावना तयार झाली.

यासंदर्भात भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे तत्कालीन तालुका अध्यक्ष डॉ.मनोज उत्तमराव महाजन यांनी अंजली दमानिया यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आणि खडसे यांची मानहाणी आणि अब्रू नुकसान केल्याप्रकरणी अंजली दमानिया यांच्या विरुद्ध दावा दाखल केला.

दाखल झालेल्या या दाव्याच्या अनुषंगाने फौजदारी न्याय संहिता २०२ नुसार चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते.या चौकशीचा अहवाल २०१८ मध्ये पोलिसांनी न्यायालयात सादर केला आणि न्यायालयाने अंजली दमानिया यांच्या विरोधात दाखल झालेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यावर कामकाज सुरू केले.दरम्यान,शिरपूर येथे दाखल झालेल्या अब्रू नुकसानी दाव्याच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठातून स्थगिती मिळाली असल्याची माहिती अंजली दमानिया यांच्यावतीने शिरपूर न्यायलायास देण्यात आली होती.यामुळे उच्च न्यायालयातून स्थगिती मिळाली असल्याबद्दलचे पुरावे अंजली दमानिया यांच्याकडून शिरपूर न्यायालयाने मागितले पण दमानिया यांच्याकडून तब्बल सहा वर्षे होऊनही उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठातून स्थगिती मिळवल्याचा पुरावा शिरपूर न्यायालयात सादर करण्यात आला नाही.दावा दाखल झाल्यानंतर अंजली दमानिया या शिरपूर न्यायालयात हजर झाल्याच नाहीत,यामुळे अखेर एक ऑगष्ट २०२५ रोजी शिरपूर न्यायालयाने दमानिया यांना २३ सप्टेंबर २०२५ पर्यंत हजर राहण्याचे आदेश (जामीनपात्र वॉरंट) दिले.

२०१६ ते २०१९ दरम्यान माजी मंत्री तथा भाजपाचे नेते एकनाथराव खडसे हे केवळ उत्तर महाराष्ट्रातलेच नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा चेहरा होता. अशा काळामध्ये  अंजली दमानिया यांनी भाजपा नेते एकनाथराव खडसे यांच्यावर विविध आरोप केले.यामुळे केवळ एकनाथराव खडसे यांचीच मानहानी झाली नाही, तर संपूर्ण भारतीय जनता पक्षाचीही  बदनामी झाली.यामुळे एकनाथराव खडसे यांच्या मानहाणी व अब्रूनुकसानी बद्दल दमानिया यांच्या विरुद्ध दावा दाखल केला आहे.

-डॉ.मनोज महाजन

====

“पोलिसांकडून झालेल्या चौकशीचा अहवाल २०१८ मध्ये न्यायालयात सादर झाला आणि न्यायालयाने माजी मंत्री खडसे यांची मानहाणी आणि अब्रूनुकसानी झाल्याच्या दाव्यावर कामकाज सुरू केले.न्यायालयाने जमीनपात्र वॉरंट बजावले असून २३ सप्टेंबर २०२५ पर्यंत अंजली दमानिया यांनी आवश्यक पुरावे न्यायालयात सादर करणे अपेक्षित आहे.”

-ऍड.अमित जैन
=====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *