ईव्हीएम छेडछाड अशक्य; तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध : निवडणूक आयोगाचा दावा

मुंबई

भारत निवडणूक आयोगाने (ECI) महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी व पडताळणी प्रक्रियेत सर्व यंत्रे योग्य स्थितीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

आयोगाच्या 17 जून 2025 च्या सूचनांनुसार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी 10 उमेदवारांच्या विनंतीनुसार 10 विधानसभा मतदारसंघांमधील मतदार युनिट (BU), नियंत्रण यंत्र (CU) व व्हीव्हीपॅट (VVPAT) यांची तपासणी केली. सर्व यंत्रांनी निदान चाचण्या उत्तीर्ण केल्या व व्हीव्हीपॅट स्लिप आणि ईव्हीएम निकालात कोणताही फरक आढळला नाही.

या प्रक्रियेत 8 उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पाहिली. एकूण 48 मतदार युनिट, 31 नियंत्रण यंत्रे आणि 31 व्हीव्हीपॅट यांची तपासणी झाली. दोन उमेदवारांनी उपस्थित राहणे टाळले.

काही मतदारसंघांमध्ये (कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला, माजलगाव) मायक्रोकंट्रोलर व मेमरी पडताळणीसाठी निदान चाचणी घेण्यात आली. तर पनवेल, अलीबाग, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि उर्वरित माजलगाव येथील यंत्रांवर निदान चाचणीबरोबरच मॉक पोल घेण्यात आला. सर्व चाचण्यांमध्ये यंत्रे योग्य कार्यरत असल्याचे प्रमाणित झाले.

निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही. त्यामुळे निकालांबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *