धुळे तालुक्यात एका तरुणाचा वीजेचा शॉक लागून मृत्यू ; वीज वितरणच्या अधिकार्‍यांवर गुन्हा, वायरमनसह दोघांना अटक

चुकीचे फिडर बंद केल्याने धुळे तालुक्यात
एका तरुणाचा वीजेचा शॉक लागून मृत्यू

वीज वितरणच्या अधिकार्‍यांवर गुन्हा, वायरमनसह दोघांना अटक

धुळे जिल्हा

तांत्रिक काम सुरु असलेले फिडर बंद न करता भलतेच फिडर बंद केल्याने विजेचा तीव्र धक्का बसून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना धुळे तालुक्यातील वार गावात रात्री घडली. याप्रकरणी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, लाईनमन आणि ऑपरेटर अशा चार जणांविरुद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी ऑपरेटर आणि लाईनमन यांना अटक केली आहे. आकाश उर्फ विक्की युवराज पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
वार येथील मराठी माध्यमिक शाळेजवळ वीज वितरण एबीस्वीच आहे. या ठिकाणी असलेल्या ११ किलो व्हॅट क्षमतेच्या केंद्रात २७ जुलै रोजी तांत्रिक बिघाड झाल्याने दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम वीज कंपनीचे लाईनमन दीपक नाना चौधरी यांनी स्वतः करणे अपेक्षित होते, परंतु तसे न करता त्यांनी काम पूर्ण करण्यासाठी आकाश पाटील यांना अनाधिकृतपणे सोबत नेले. यावेळी वरिष्ठ ऑपरेटर रोहिदास वानखेडे यांनी कार्यालयातून वीज वितरण कंपनीचे वार येथील फिडर बंद न करता सांजोरी गावचे फिडर निष्काळजीपणे बंद केले आणि जेथे काम सुरु होते तेथील वीज प्रवाह सुरूच राहिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. यावेळी सहाय्यक अभियंता हेमंत दिलीप ठाकूर आणि उपकार्यकारी अधिकारी मनोज सुदाम भावसार यांनी त्यांच्या नियत्रंण आणि अधिपत्याखाली काम करणार्‍या दीपक चौधरी आणि रोहिदास वानखेडे यांच्याकडुन अनधिकृतपणे काम करवुन घेण्यास प्रेरणा दिल्याचा आरोप आहे.

विजेच्या तीव्र धक्क्याने आकाश पाटील विद्युत खांबावरून खाली पडला. २७ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेला ही घटना घडली.आकाश यास तातडीने रुग्णालयात हाळविण्यात आले,परंतु उपचारादरम्यान आकाश पाटील यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात योगेश मगन पाटील रा.मुकटी (ता.धुळे) यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या फिर्यादीवरून पोलिसांनी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता उपकार्यकारी अभियंता वरिष्ठ ऑपरेटर व लाईनमन अशा चार जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर हे करीत आहेत.

“या प्रकरणात वरिष्ठ ऑपरेटर आणि वायरमन अशा दोन आरोपिंना आम्ही अटक केली आहे.आणखी तपास सुरु आहे.”

– साईनाथ तळेकर
पोलीस उपनिरीक्षक
(पश्चिम देवपूर पोलीस ठाणे,धुळे)
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *