धुळे जिल्हा
अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, भाडणे,तालुका साक्री येथे “आत्मसंरक्षणासाठी शिवकालीन मर्दानी खेळ व लाठी- काठी प्रशिक्षण शिबिराचे” उद्घाटन साक्री विधानसभेच्या आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या शुभहस्ते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय बांबळे व भाडणे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री अजय सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष साजरे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, धुळे येथील श्री संजय सैंदाणे,सहायक आयुक्त यांच्या संकल्पनेतून भाडणे, तालुका साक्री येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थिनींच्या आत्मसंरक्षणासाठी शिवकालीन मर्दानी खेळ व लाठी काठी प्रशिक्षण शिबिराचे दिनांक 19 /7/ 2025 ते 24 /7/ 2025 दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज साक्री विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ. मंजुळाताई गावित व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ” आजच्या काळात मुलींनी स्वसंरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून शिवकालीन पारंपारिक मर्दानी खेळ तसेच लाठी- काठी प्रशिक्षण घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. गावित यांनी केले. याप्रसंगी आ. गावीत यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अंतराळवीर सुनीता विल्यम्स अशा यशस्वी व महान महिला नेतृत्वाचे उदाहरण देऊन विद्यार्थिनींना प्रेरित केले. तसेंच अभ्यासाबरोबरच शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होऊन स्वतःचे आत्मबल देखील विद्यार्थिनींनी वाढविले पाहिजे व सक्षमपणे व निर्भयपणे समाजात वावरले पाहिजे” असेही त्यांनी पुढे सांगितले.
” विद्यार्थिनींनी शालेय वयापासूनच शरीर तंदुरुस्ती कडे लक्ष देऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करावी आणि पोलीस क्षेत्रात सहभागी होण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस उपधीक्षक श्री संजय बांबळे यांनी केले ”
सदर सहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर गुरुमेक भारती दांडपट्टा आखाडा येथील कुशल प्रशिक्षक श्री शैलेश पावनकर, कु.मनस्वी विभांडिक, चि. चिन्मय पावनकर, व तन्मय पावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री संजय सैंधाणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, कार्यालय धुळे यांनी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला तसेच शासकीय निवासी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनेश दराडे यांनी तर आभार प्रभारी मुख्याध्यापक श्री चेतन हिरे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी नगरसेवक श्री मुकेश शिंदे, खानदेश युथ क्लबचे प्रतिनिधी, एकलव्य मॉडेल स्कूलचे शिक्षक व विद्यार्थिनी, तसेच श्री कमलाकर मोहिते, डॉ. भूषण अहिरराव, श्रीमती सोनाली महाजन, श्री संजय जगताप, श्री कानडे, क्रिस्टल कंपनीचे सर्व कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.