धुळे शहर
धुळे शहराचे माजी आमदार फारुक शहा यांनी आज एमआयएमला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचे स्वागत केले. या प्रवेशाने आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा लाभ मिळणार असल्याचे व धुळे शहर विधानसभा मतदार संघाच्या राजकारणाची दिशा बदलेले असे म्हटले जात आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री हसनमुश्री यांची उपस्थिती होती.
धुळे महा पालिकेचे नगरसेवक उपमहापौर ते आमदार असा फारूक शहा यांचा राजकीय प्रवास आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. एमआयएम या पक्षाला फारसे विचारात न घेणाऱ्या प्रस्थापित राजकीय पक्षांना फारूक शहा यांच्या ऐतिहासिक विजयाने चांगलाच धक्का बसला.
तर गेल्या वर्षी २०२४ च्या विधानसभा निवडणूक एमआयएमतर्फे फारूक शहा यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवली, कट्टर विरोधी भाजपाच्या अनुप अग्रवाल यांच्यात तुल्यबळ लढाई झाली. फारूक शहा यांनी मुस्लिम आणि मागासवर्गीय मते मोठ्या प्रमाणात मिळवली मात्र भाजपचे अनुप अग्रवाल हे मोठ्या फरकाने विजयी झाले. अल्पसंख्याक समाजात दबदबा निर्माण करणारे फारूक शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) घेतलेला प्रवेश शहरातील राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.