तिघे शार्दूल भावांना आजन्म करावास ; न्यायाधीश माधुरी आनंद यांनी सुनावली कठोर शिक्षा

धुळे शहर

किरकोळ कारणावरून वाद घालून मिल परिसरातील युवकाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी मयूर शार्दूल आणि दोघा भावांना आजन्म करावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे परिस्थितीजन्य पुराव्यासह केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. न्यायालयाने आज दिलेल्या या निकालाने प्रामुख्याने मिल परिसर आणि संपूर्ण जिल्ह्यातल्या गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

किरकोळ करणावरून वाद घालून मयूर मच्छिन्द्र शार्दूल (वय ३५ वर्षे), मनोज मच्छिन्द्र शार्दूल (वय ३०वर्षे) व आणि मुकेश मच्छिन्द्र शार्दूल (वय २२ वर्षे) सर्व रा. विद्युत नगर, सुरतवाला बिल्डिंग जवळ, मिल परिसर धुळे यांनी निखिल साहेबराव पाटील (वय २० वर्षे) रा.विद्युत नगर सुरतवाला बिल्डिंग जवळ,धुळे याच्यावर लाठ्याकाठ्यांनी प्राणघातक हल्ला चढविला.४ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी सव्वासात वाजेला शासकीय दूध डेअरी रस्त्यावरील स्वराज जिम जवळ झालेल्या या तीव्र हल्ल्यात निखिल पाटील हा रक्तबंबाळ झाला आणि गंभीर जखमी झाल्याने तो मरण पावला होता.

याप्रकरणी मृत निखिलचा भाऊ दीपक साहेबराव पाटील याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. घरगुती कारणावरून वाद घालून मयूर मनोज आणि मुकेश शार्दूल या तीनही भावांनी निखिल पाटील याच्यावर हल्ला चढवीला या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने निखिलचा मृत्यू झाला असा आरोप या फिर्यादितून करण्यात आला होता. या फिर्यादीवरून पोलिसांनी शार्दूल बंधूविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील यांनी या खून प्रकरणाचा तपास केला होता.यानंतर त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज झाले.न्यायालयाने उभय पक्षाचा युक्तिवाद नोंदविताना परिस्थितीजन्य पुरावे आणि १२ साक्षीदार तपासले.दरम्यान,जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय मुरक्या यांनी आपल्या प्रभावी युक्तिवादातून हा भीषन हल्याचा घटनाक्रम,मृत निखिल पाटीलच्या शव विच्छेदनातून स्पष्ट झालेल्या त्याच्या अंगावरील खोलवरच्या जखमा आणि रक्तस्राव न्यायालयाच्या  निदर्शनास आणून दिला.हा युक्तिवाद आणि परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरला.

मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी मयूर शार्दूल,मनोज शार्दूल व मुकेश शार्दूल या तीनही भावांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड आणि आजन्म कारावास अशी शिक्षा सुनावली.दंड न भरल्यास प्रत्येकी एक महिना सश्रम कारवास अशी शिक्षा भोगावी लागेल असेही न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे अशी माहिती अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय मुरक्या यांनी दिली.

या खटल्यात मृत निखिल पाटील याचा फिर्यादी भाऊ दीपक पाटील आणि आई वंदना साहेबराव पाटील तसेच मामा योगेश संतोष पाटील आणि अनिल किशोर पाटील हे चौघेही फितूर झाले. या चौघांनी सरकार पक्षाला अपेक्षित सहकार्य केले नाही.

– संजय मुरक्या , अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, धुळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *