देशव्यापी संपात सहभागी होत धुळ्यात
कामगार, कर्मचारी संघटनांनी काढला मोर्चा
धुळे जिल्हा
देशातील ११ कामगार संघटनांनी केंद्र शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी आज देशव्यापी संप पुकारला असून त्या संपाला सक्रीय पाठिंबा देत आज धुळे जिल्ह्यातही विविध कामगार संघटना, सरकारी कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना तसेच पोस्ट कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निदर्शेने केली.
धुळे शहरातील कल्याण भवन जवळून मोर्चाला सुरुवात झाली. यानंतर क्युमाईन क्लब समोर मोर्चा पोहोचला असता सभेत रुपांतर झाले. यानंतर शिष्टमंडळातर्फे जिल्हा प्रशासनाला विविध २० मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या विश्वासाने युती शासनाची प्रचंड बहुमताने निवड केली मात्र कुठल्याही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि हल्लीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाने जुनी पेन्शन, शिक्षण विभाग, आरोग्य विभागा बाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे असश्वासन दिले होते तथापि पुढे काहीही सकारात्मक घडले नाही.
देशातील ११ कामगार संघटनांनी केंद्र शासनाच्या कर्मचारीविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी या देशव्यापी संपाला पाठिंबा दिला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. प्रलंबित मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली. राज्य कर्मचारीही प्रलंबित मागण्यांसाठी सप्टेंबर २०२५ ला मोठे आंदोलन करणार आहेत अशी मागणी यावेळी देण्यात आली.
या मोर्चात राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक डॉ.संजय पाटील, कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक कॉ.एल.आर.राव, जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी, कोषाध्यक्ष सुधीर पोतदार, कार्याध्यक्ष सुरेश पाईकराव, कार्यालयीन सचिव अविनाश मोरे, राज्य सहसचिव वाल्मिक चव्हाण, सुरेश बहाळकर, दिपक पाटील, मंगेश कंडारे, मोहन कपोले आदींनी सहभाग घेतला.