धुळे जिल्हा
वीज दरवाढीचे सुधारीत आदेश उद्योग व्यवसायाला जबर फटका देेेणारे ठरणार आहेत, त्याचवेळी घरावर सोलर बसवणाऱ्या सामान्य लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरू शकतो, त्यामुळे तत्काळ हा प्रस्तावित वीज दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी जिल्हातील व्यापारी संघटनांनी केली आहे.
मंगळवारी धुळे जिल्हा प्रशासनाला सर्व व्यापारी, उद्योजक यांनी निवेदन दिले त्यात म्हटले आहे, की अगोदरच देशात सर्वाधिक वीजदर हे महाराष्ट्रात आहेत. त्यात आता आणखी 25 ते 35 टक्के होणारी दरवाढ ही उद्योधंद्यांसाठी मारक ठरणार आहे. त्यामुळे या प्रस्तावित वीज दरवाढीला आमचा प्रखर विरोध आहे. तसेच घराच्या छतावर सोलर पॅनल बसविणार्या वीज ग्राहकांच्याबाबतही महावितरणचे चुकीचे धोरण आहे. कारण दिवसा आठ तास वापरलेल्या विजेतूनच ग्राहकांना वजावट मिळणार आहे. रात्रीचा वीज वापर वजावट केला जाणार नाही, असे हे मारक धोरण आहे. मात्र, यास उच्च न्यायालयाने 14 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. ती कायम ठेवावी, अशी आमची मागणी आहे. मानक प्रक्रियेनुसार महावितरणने प्रकरण क्र.217/2024 अंतर्गत पाचव्या नियंत्रण कालावधीसाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तब्बल चार हजार 400 हून अधिक आक्षेप प्राप्त झालेत. त्यानंतर अनेक ठिकाणी सार्वजनिक सुनावणी घेण्यात आली. ज्यामुळे 28 मार्च 2025 रोजी एईआरसीने संतुलित आदेश मंजूर केला. या आदेशाचे सर्व श्रेणीतील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले. तथापि, 2 एप्रिल 2025 रोजी महावितरणने दाखल केलेल्या पुनरावलोकन याचिकेनंतर एमईआरसीने अनपेक्षितपणे आदेशाला स्थगिती दिली. पुनरावलोकन याचिकेत महावितरणच्या ताळेबंदातील आर्थिक आकडेवारी सुधारण्याची परवानगी मागण्यात आली होती, ज्यामुळे शेवटी सर्व ग्राहक श्रेणींमध्ये दरांमध्ये बदल झाले. सुधारित दरांचा थेट परिणाम सर्व ग्राहकांवर होत असल्याने, वीज कायद्याच्या कलम 64(1) ते 64(3) अंतर्गत अंतिम आदेश जारी करण्यापूर्वी 30 दिवस आधी प्रस्तावित बदल प्रकाशित करणे आणि सार्वजनिक हरकती मागविणे अनिवार्य होते. मात्र, हा महत्त्वाचा टप्पा वगळण्यात आला आणि 25 जून 2025 रोजी सुधारित आदेश जारी करण्यात आला. ज्यामुळे घरगुती, औद्योगिक अशा सर्व श्रेणीतील ग्राहकांवर लक्षणीय परिणाम झाला. त्यामुळे 28 मार्च 2025 रोजीचा मूळ आदेश पूर्ववत करावा, अशी मागणी ऑल इंडिया रीनिवेबल एनर्जी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पोतदार, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष वर्धमान सिंगवी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, नितीन संघवी, साबीर शेख, भागवत सोनगिरे, चेतन वानखेडे, अश्विनी परदेशी, नितीन भडागे यांच्यासह ऑल इंडिया रीनिवेबल एनर्जी असोसिएशन, इंडियन मेडीकल असोसिएशन, धुळे अवधान मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, वीज ग्राहक संघटना, स्पून पाईप असोसिएशन, धुळे जिल्हा सराफा असोसिएशन, इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे पदाधिकारी व सदस्य यांनी केली आहे.