धुळ्याला दंगलीच्या आगीत ढकलण्याचा सतत प्रयत्न- आमदार अनुप अग्रवाल 

 

विशिष्ट समाजकंटकांकडून धुळ्याला दंगलीच्या आगीत ढकलण्याचा सतत प्रयत्न- आमदार अनुप अग्रवाल 

`पॉइंट ऑफ इन्फर्मेशन’द्वारे विधिमंडळात मांडली चिंता

मुंबई

धुळे शहरातील विविध भागांत काही महिन्यांपासून विशिष्ट घटकांकडून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडून दंगल घडेल, यासाठी चिथावणीचे प्रकार सुरू झाले आहेत. काही महिन्यांपासून हिंदू नागरिकांवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांनी साऱ्यांचीच चिंता वाढली आहे. या प्रकारांमुळे शहरातील सामाजिक सलोखा धोक्यात आला असून, अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी संबंधितांवर कठोरात कठोर कारवाईची गरज असताना काहीच ठोस कारवाई होत नसल्याने समाजकंटक मोकाट आहेत. राज्य शासनाने वेळीच हस्तक्षेप करत पोलिस प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करत आज आमदार अनुप अग्रवाल यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात धुळेकरांना वाटणारी चिंता व्यक्त केली.

महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनात आज `पॉइंट ऑफ इन्फर्मेशन’द्वारे आमदार अग्रवाल यांनी शहरात समाजकंटकांकडून काही महिन्यांपासून होत असलेल्या चिथावणीखोर प्रकारांना पायबंद घालण्याबाबतचा प्रश्न मांडला, त्यावेळी ते बोलत होते.

धुळेकर सतत भीतीच्या सावटाखाली
आमदार अग्रवाल यांनी सांगितले, की धुळे शहरात गेल्या ३० एप्रिलला वक्फ कायद्याला विरोध करताना विनापरवानगी शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार घडला. याच वेळी काही जिहादी मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी हिंदूबहुल भागांतील मंदिरांसह रहिवास भागाला लक्ष्य करत दगडफेक केली. या प्रकरणी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हाही दाखल केला. मात्र, समाजकंटकांवर अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही. गेल्या २१ मेस ख्रिश्चन मिशनरी युवतींकडून भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जाऊन गोरगरीब रुग्णांना तसेच रहिवास भागातील नागरिकांना बायबल ग्रंथ आपल्या छातीवर ठेवला, तर आपले सारे असाध्य आजार बरे होतील, असे सांगत धर्मांतराबाबत भलावण करण्याचा प्रयत्न झाला. याबाबत संबंधित युवतींवर गुन्हा दाखल होऊन अटकही झाली. मात्र, केवळ नोटीस देऊन त्यांना पुन्हा मोकळे सोडण्यात आले. दोन जूनला शहरातील सतत गजबज असणाऱ्या पाचकंदील परिसरात मुस्लिम समाजातील फळ विक्रेत्यांकडून हिंदू व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली. हिंदूंना मारहाणीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. याबाबत पोलिसांकडून कुठलीच ठोस कारवाई केली जात नाही. झालीच तर थातूर-मातूर कारवाई करून संशयितांना लगेच जामिनावर सोडून दिले जाते. शहरातील देवपूरमधील एका पान दुकानावर गेलेल्या हिंदू युवकांशी किरकोळ कारणावरून वाद घालत तेथे जमलेल्या जमावाने बेदम मारहाण केली. यानंतर परिसरातील हिंदूबहुल भागात जमावाने दगडफेक करत सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रकार केला.

धुळे शहर दंगलीच्या उंबरठ्यावर
शहरातील मोहाडी परिसरातही हिंदू नागरिकांच्या वस्तीवर पिण्याचे पाणी घेऊन जाणाऱ्या टँकरवर चढून जिहादी तरुणांनी गोमासांची पार्टी करणे, गोमांस खाऊन ते टँकरच्या पाण्यात थुंकणे, असा किळसवाणा प्रकार नुकताच घडला. वारंवार होत असलेल्या अशा दगडफेकीच्या, पाचकंदील परिसरात होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे शहरातील सामाजिक सौहार्द बिघडत आहे. शहरात केव्हाही दंगल भडकू शकते. आधीच धुळे शहरात तीन वेळा झालेल्या जातीय दंगलींमुळे धुळेकर नागरिक होरपळून निघाले आहेत. यामध्ये शहराची बदनामी तर होतेच शिवाय शहराच्या विकासालाही खीळ बसते. या प्रकरणी शासनाने जिल्हा पोलिस प्रशासनाला असल्या प्रकारांची वेळीच दखल घेत संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.

विशिष्ट भागांमध्येच रात्रभर वर्दळ का?

धुळे शहरातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागांमध्ये रात्री दहा-साडेदहानंतर सर्व दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने बंद केली जातात. एखाद-दुसरा धार्मिक कार्यक्रम होत असेल, तर लगेच पोलिसांचे वाहन दाखल होऊन ते बंद केले जातात. दुसरीकडे शहरातील देवपूरमधील अंदरवाली मशीद, हजारखोली, मौलवी गंज, कबीरगंज, १०० फुटी रोड, जुना वडजाई रोड, कामगार नगर, सार्वजनिक हॉस्पिटल, तिरंगा चौक आदी भागांमध्ये मात्र रात्रभर खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने, ठेले, चहा, पानटपऱ्या आदी दुकाने बिनदिक्कतपणे सुरू असतात. संबंधित पोलिस ठाण्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची ही दुकाने बंद करण्याची हिंमत होत नाही, इतकी दहशत निर्माण झाली आहे. यातून अनेकदा किरकोळ कारणांवरून वाद होऊन दंगली भडकण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे पोलिस प्रशासनाने अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी शहरातील सर्वच भागांतील दुकाने रात्री साडेदहानंतर बंद करावीत, गर्दी होणार नाही, यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *