धुळे शहर
धुळे शहरातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक देत अंधार्या लायब्ररीच्या खोलीत डांबून ठेवले जात असल्याची धक्कादायक तक्रार पालकांनी दिल्याने आला. भारतीय जनता पक्षाचे महानगरजिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी त्वरीत शिक्षणमंत्री दादा भूसे यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली. तसेच शाळेत ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शिक्षणाधिकार्यांनी चावरा स्कूलच्या प्रिन्सीपल आणि व्यवस्थापकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
ऍड. प्रविणकुमार परदेशी यांचे दोन मुले चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत असून इ. ७ मध्ये जयकुमार परदेशी व इ. ४ थीमध्ये कनिष्का परदेशी हे शिकत आहेत. त्यांच्यासह काही विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षाची ङ्गी भरली नाही म्हणून शाळा व्यवस्थापनाने थेट त्यांना लायब्रीरीच्या अंधार्या खोलीत वेगळे बसवून क्रूर पद्धतीची वागणूक दिली. शाळा १६ जून ला सुरू झाली आणि १७ तारखेपासून सातत्याने या विद्यार्थ्यांना इतर मुलांमधून वेगळे काढून अमानुष वागणूक दिली जात असल्याची माहिती याविद्यार्थ्यांनी पालकांना दिल्याचे ऍड. प्रविणकुमार परदेशी यांनी सांगितले. आपल्या मुलांसह शाळेतील ३५ ते ४० विद्यार्थ्यांची अशाच पद्धतीने क्रूर वागणूक शाळेच्या समन्वयक नलिनी पाटील यांनी शाळेचे मुख्याध्यापक ऍलेक्स ङ्गादर यांच्या आदेशाने दिल्याची तक्रार केली आहे. हा सर्व प्रकार शिक्षणहक्क कायद्यानुसार गंभीर गुन्हा असल्याने ऍड. प्रविणकुमार परदेशी यांनी शिक्षणाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन आणि देवपूर पश्चिम पोलीसांकडे या विषयी लेखी तक्रार केली. शाळेच्या लायब्ररी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांना ऍड. परदेशी यांनी शाळेकडून मुलांना दिल्यागेलेल्या त्रासा विषयी सांगितले असता अंपळकर यांनी त्वरीत शिक्षणमंत्री दादाजी भूसे यांचे चिरंजीव अविष्कार भूसे यांना संपर्क साधला आणि सर्व हकीकीत सांगितली. त्यानंतर भूसे यांनी धुळे येथील शिक्षणअधिकार्यांना सूचना केल्या. त्यानुसार रात्री चावरा हायस्कूलमध्ये शिक्षणाधिकारी यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि इतर संबंधीत अधिकारी दाखल झाले होते. ऍड. प्रविणकुमार परदेशी यांच्या मागणीनुसार शाळेचे सीसीटीव्ही ङ्गुटेजही त्यांना सोपविण्यात आले.
चावरा हायस्कूलच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांसोबत ङ्गीसाठी केलेली वागणूक अतिशय संपापजनक आणि अमानविय आहे. याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जावी अशी आपली मागणी असल्याचे ऍड. प्रविणकुमार परदेशी यांनी म्हटले आहे. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी त्वरीत मदत करीत न्याय मिळवून दिला त्याबद्दल आपण त्यांचे आभारी असल्याचेही म्हटले आहे.
यावेळी या सर्व घडामोडीवेळी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशिल महाजन, प्रभादेवी परदेशी, मा. नगरसेवक नरेश चौधरी, निलेश नेमाणे आदी उपस्थित होते.