धुळे जिल्हा
लोणखेडी (ता. धुळे) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा प्रगतिशील शेतकरी रमेश यादवराव पाटील यांचा येथील कृषी महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या कृषी दिनानिमित्तच्या कार्यक्रमात प्रयोगशील शेतकरी म्हणून सन्मान करण्यात आला. श्री. पाटील यांनी २०२४-२५ या वर्षीच्या खरीप हंगामात मक्याचे हेक्टरी तब्बल ७४.८० क्विंटल उत्पादन घेत धुळे तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला होता. यानिमित्त त्यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व तीन हजार रुपयांचे बक्षीस देऊन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी यांनी सन्मानित केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त येथील कृषी महाविद्यालयात राज्य शासनाचा कृषी विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समितीचा कृषी विभाग व आत्मातर्फे नुकताच कृषी दिनाचा कार्यक्रम झाला. यात जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. कार्यक्रमांस जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, आत्माचे प्रकल्प संचालक हितेंद्र सोनवणे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. देसले, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ .दिनेश नांद्रे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितीन खंडेराय, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी आदी उपस्थित होते.
लोणखेडीचे प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी रमेश पाटील हे आपल्या शेतीत सातत्याने विविध पिकांचे भरघोस उत्पन्न घेतात. तसेच त्यांनी आपल्या शेतात विविध फळझाडांची लागवड केली आहे. विशेषतः केशर आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, रामफळ, लिंबू आदींचेही ते दर वर्षी भरघोस उत्पादन घेत आहेत. विशेष म्हणजे ते स्वतः विविध फळझाडांवर कलमे करून उत्पादन घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारानिमित्त लोणखेडी येथील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.