मुंबई
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री तथा भाजपचे विद्यमान प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड झाली. भारतीय जनता पक्षाच्या राज्य परिषदेचे अधिवेशन मुंबईत झाले, त्यात श्री. चव्हाण यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्वीकारली. यानिमित्त धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, धुळे शहराचे भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी श्री. चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी पक्षाच्या केंद्रीय समितीने केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना निरीक्षक म्हणून पाठविले होते. श्री. रिजिजू यांच्या उपस्थितीत सोमवारी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात निवडीची प्रक्रिया झाली. प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, अशोक उईके, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे आदी उपस्थित होते.
पक्षाच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात मावळते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे पदाची सूत्रे सोपविली. यानंतर पालकमंत्री रावल, आमदार अनुप अग्रवाल यांनी श्री. चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला व अभिनंदन केले.