धुळे जिल्हा
महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमांसोबत हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासंबंधीचे परिपत्रक राज्य शासनाने काढले असून धुळे शहरात जुन्या महानगरपालिका चौकात या परिपत्रकांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज होळी करण्यात आली.
यावेळी राज्य शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून, महाराष्ट्रात कुठल्याही भाषेची बळजबरी चालणार नाही असे ठणकावत उबाठा वतीने आंदोलन करण्यात आले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना मराठी भाषे बाबत महाराष्ट्रातील अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आधीच आडमुठे धोरण आहे. या इंग्रजी माध्यमाच्या शाळा मराठी भाषा टाळण्याचा जाणून-बुजून प्रयत्न आधीच करत आलेल्या आहेत.
हा विषय फक्त मराठी भाषेचा विषय नसून महाराष्ट्राची संस्कृती ओळख आणि राज्य भिमानाचा मुद्दा आहे. शिक्षणाच्या नावाखाली मातृभाषेची गळचेपी, महाराष्ट्रातील जनता कदापीही सहन करणार नाही ,गुजरात मध्ये हिंदी सक्तीची नाही मग तिची सक्ती महाराष्ट्रातच का? असा प्रश्न यावेळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
तसेच महाराष्ट्र राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठीची दुसरी भाषा म्हणून सक्ती करण्याच्या निर्णयाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्य शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
या आंदोलनात उबाठा शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, युवा सेनेचे पंकज गोरे , सुनील पाटील संदीप सूर्यवंशी, महिला आघाडीचा संगिता जोशी, ज्योती चौधरी, राजु ढवळे, शेखर वाघ, शिवाजी शिरसाळे, अण्णा फुलपगारे , सुभाष मराठे, मुन्ना पठाण, कपील लिंगायत आदी सहभागी झाले होते.