`आरोग्याची वारी- पंढरीच्या दारी’अंतर्गत 300 वारकऱ्यांची `चरणसेवा’!
धुळे शहर
आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतील एबी फाउंडेशन, येथील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे सार्वजनिक आरोग्य विभाग व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने शुक्रवारी (ता. 27) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे पायी दिंडीद्वारे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी `आरोग्याची वारी- पंढरीच्या दारी’ उपक्रमांतर्गत चरणसेवेचा उपक्रम राबविण्यात आला. यात चालून-चालून थकलेल्या सुमारे 300 वारकऱ्यांच्या पायांची मालिश तसेच आरोग्य तपासणी करत त्यांच्यावर औषधोपचारही करण्यात आले.
आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जुने धुळ्यातील सुभाष चौकातील वीर भगतसिंह चौकात आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम झाला. शिंदखेडा येथील बालाजी संस्थानचे मठाधिपती मेघश्याम महाराज बुवा यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडीतील 300 हून अधिक महिला-पुरुष वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. यावेळी हृदयरोग, सर्दी, थंडी, ताप, रक्तदाब, डायबेटिस, अपचन आदींचा त्रास होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. एबी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सेवेने सर्वच वारकरी भारावून गेले व त्यांनी आमदार अग्रवाल यांच्यासह संयोजक एबी फाउंडेशन, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे पदाधिकारी, वैद्यकीय पथकाचे आभार मानत शुभाशीर्वाद दिले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, माजी महापौर प्रतिभा चौधरी, प्रदीप कर्पे, माजी नगरसेविका मायादेवी परदेशी, महादेव परदेशी आदी उपस्थित होते. एबी फाउंडेशनचे कमलेश देवरे, पप्पू डापसे, चंद्रकांत पोद्दार, प्रमोद सोनार, नकुल पोद्दार, रमेश निकम, गणेश निकम, डॉ. योगेश पाटील, कपिल पिवाल यांच्यासह रुग्णसेवकांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले. डॉ. निखिल पाटील, डॉ. उज्ज्वला सुभेदार, परिचारिका सरिता मोहिते, विद्या इंदवे आदींनी वारकरी बांधवांची आरोग्य तपासणी करत औषधोपचार केले.
मेघश्याम महाराजांच्या हस्ते औषधांच्या किटचे वाटप
एबी फाउंडेशनतर्फे यापूर्वीही वणी येथील सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या हजारो भाविकांची आरोग्य तपासणी करत त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले होते. आता काही दिवसांपासून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे पायी दिंडीद्वारे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवार्थ चरणसेवेसह आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे शिंदखेडा येथील मठाधिपती मेघश्याम महाराज बुवा यांच्यासह वारकऱ्यांनी कौतुक केले. यावेळी मेघश्याम महाराजांच्या हस्ते वारकऱ्यांना दिंडी मार्गात कुठलीही आरोग्याची समस्या जाणविल्यास त्यासाठी औषधांचे कीट देण्यात आले. यामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.