धुळे जिल्हा
राज्याचे पणनमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे नेते जयकुमार रावल यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार कुणाल पाटील यांनी भेट घेतल्याने कुुुणाल बाबा यांचा लवकरच भाजप पक्षात प्रवेश होण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे म्हटले जाते आहे.
माजी आ.पाटील यांच्या भाजप प्रवेशाने मात्र खान्देशात काँग्रेसचे मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान कुणाल पाटील यांनी शनिवारी आपल्या समर्थकांचा मेळावा आयोजित केल्याचे वृत्त ही समोर आले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कुणाल पाटील हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. परंतू, त्याचा मुहूर्त ठरत नव्हता. आता मात्र कुणाल पाटील यांच्या प्रवेशाचा निर्णय पक्का झाल्याचे बोलले जात आहे. कारण, शुक्रवारी दुपारी माजी आमदार कुणाल पाटील यांनी राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी जाऊन रावल यांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे निष्ठावंत मानले जाणारे डॉ.दरबारसिंग गिरासे आणि युवराज करनकाळ आदी पदाधिकारीही होते.या भेटीत भाजप प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
हा पक्ष प्रवेश येत्या एक जुलै रोजी किंवा पावसाळी अधिवेशन काळात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे माजी आ.पाटील यांच्या भाजप प्रवेशाने खान्देशात काँग्रेसचे मोठे नुकसान होणार असल्याचा राजकीय जाणकारांचा निष्कर्ष आहे. यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी कुणाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,मी एका ठिकाणी सांत्वनासाठी आलो आहे, या विषयावर आपणांशी बोलतो.