धुळे जिल्हा
साक्री तालुक्यातील एका पाडयात अल्पवयीन बालिकेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती वाय.जी.देशमुख यांनी पाचही जणांना दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी दहा हजाराचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी शेतात असलेल्या झोपडी वजा घरात आजी व लहान भावासोबत वास्तव्यास असतांना मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर आली. यावेळी शेता लगत दबा धरून किशोर पंडीत सुर्यवंशी,छोटू उर्फ प्रशांत रतीलाल बागुल, चेतन भटू बागुल, संदेश रामदास साबळे व जयेश सुर्यवंशी या पाच मुलांनी या अल्पवयीन बालिकेवर जबरदस्तीने सामुहिक बलात्कार केला. ही घटना ३ जून २०२३ रोजी घडली होती. याप्रकरणी पीडितेच्या आजीने ४ जून २०२३ रोजी फिर्याद दिल्यावरून पाचही संशयितांविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कायदे कलमांखाली गुन्हा दाखल झाला. या गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक रोशन व्ही. निकम यांच्याकडे सोपविण्यांत आला होता.त्यांनी सर्व आरोपींना अटक केली व सोबतच गुन्हयात वापरलेले साहित्य जप्त केले आणि घटनेचा सखोल तपास करत कागदपत्रांची पूर्तता करून सर्व आरोपीं विरूध्द न्यायालयांत आरोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी येथील विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती वाय. जी. देशमुख यांच्यासमोर झाली. आरोपी जयेश सुर्यवंशी वगळता इतर सर्व आरोपी हे न्यायबंदी होते.त्यांत सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील निलेश कलाल यांनी युक्तिवाद केला.
या खटल्यात फिर्यादी,सरकारी पंच, साक्षीदार, आरोपी व पिडीतेची वैद्यकिय तपासणी करणारे डॉ. वैशाली शिरसाठ,शाळा मुख्याद्यापक जितेंद्र जाधव,डी.एन.ए. तज्ञ तपासणी अधिकारी विक्रम ढेरे, डॉ.महेश भडांगे, तपासी अंमलदार पोलीस उप निरीक्षक रोशन व्ही.निकम यांच्यासह एकूण ११ जणांच्या महत्वपुर्ण साक्ष नोंदवण्यात आल्या.सरकार पक्षाचा युक्तिवाद व परिस्थितीजन्य पुरावे यांच्या आधारावर न्यायालयाने सर्व पाच जणांना जन्मठेप,प्रत्येकी दहा हजार रुपयाचा दंड, दंड न भरल्यांस दोन महिन्याचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली.
जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांचे मार्गदर्शनाखाली सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील निलेश कलाल यांनी युक्तिवाद केला.त्यांना महिला पैरवी अधिकारी सुशिला वळवी व दत्तु सुर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.